लग्नाच्या एक आठवड्यानंतर उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील अमौली गावातील एका ४४ वर्षीय व्यक्तीने त्याच्या पत्नीची हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे ही त्याची तिसरी पत्नी होती. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
दोन विवाह तुटले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जौनपूर जिल्ह्यातील आरती पाल (२६) ही राजू पालची तिसरी पत्नी होती. दोन विवाह तुटल्यानंतर राजूने ९ मे रोजी आरतीशी लग्न केले आणि त्यानंतर लगेचच त्यांच्यात भांडणे सुरू झाली. चौबेपूरचे एसएचओ जगदीश कुसवाह यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री राजूने आरतीला काही कारणावरून बेदम मारहाण केली. तिला घऱातच नवऱ्याने प्रचंड मारहाण केली.
शेजाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमी आरतीला नरपतपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, असंही पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी आरोपी पती राजूला अटक करण्यात आली आहे, असे एसएचओने सांगितले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.