गोवा पोलिसांनी कल्पना बरिकी ३० वर्षीय महिलेला पती बसवराज याची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. एका साक्षीदारामुळे ही हत्या उघडकीस आली आहे. महिला कर्नाटकची रहिवासी असून गोव्यात एका फ्लॅटमध्ये ही हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर आरोपी महिलेने आपल्या चार प्रियकरांच्या साथीने मृतदेहाचे तीन तुकडे केले आणि गोवा-कर्नाटक बॉर्डरवर घाटात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

१ एप्रिलला ही हत्या करण्यात आली. साक्षीदाराने हिंमत दाखवली नसती तर कदाचित या हत्येचा उलगडा झाला नसता. कारण बसवराज यांच्या कुटुंबियांनी बेपत्ता झाल्याची कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. हे सर्व कुटुंबिय गोव्यातच वास्तव्याला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचे विवाहबाह्य संबंध या हत्येसाठी कारणीभूत ठरले.

बसवराज याची पत्नी कल्पनाचे चार जणांसोबत विवाहबाह्य संबंध होते, यामुळेच तिला आपल्या पतीपासून सुटका करुन घ्यायची होती. बसवराज उत्तर गोवामध्ये टॅक्सीचालक म्हणून काम करत होता. फार कमी वेळा तो घरी यायचा. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांची रोज भांडणं होऊ लागली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी महिलेला मदत करणारे तिचे प्रियकर सुरेश कुमार, पंकज पवार आणि अब्दुल शेख यांना अटक केली असून आदित्य गुज्जर फरार आहे.

आरोपी महिलेने १ एप्रिलला पतीची हत्या करण्याची योजना आखली होती. यासाठी तिने आपल्या प्रियकरांनाही बोलावलं होतं. महिलेने गळा दाबून बसवराज याची हत्या केली. यावेळी गुज्जर याने त्याचे पाय पकडले होते, तर इतरांना मृतदेहाचे तुकडे करत ते फेकून दिले.

एका प्लास्टिकच्या पिशवीत मृतदेहाचे तुकडे भरण्यात आले आणि त्याच रात्री दुधसागर येथील वेगवेगळ्या ठिकाणी ते फेकून देण्यात आले. अटक करण्यात आल्यानंतर आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे हस्तगत केले आहेत. दरम्यान पोलिसांना गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी सापडलेली नाही.