अमेरिकेतील मॅरीलँड या ठिकामी घडलेल्या भारतीय वंशाच्या तरुणीच्या हत्या प्रकरणात तिच्या एक्स बॉयफ्रेंडला आता आठ महिन्यांनी अटक करण्यात आली आहे. भारतीय वंशाची अमेरिकन नागरिक निकिता राव गोदिशलाची जानेवारी महिन्यात चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर तिचा एक्स बॉयफ्रेंड अर्जुन शर्मा फरार झाला होता. या अर्जुन शर्माला पोलिसांनी आग्र्यातून अटक केली आहे. आपण जाणून घेऊ नेमकं प्रकरण काय आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

२ जानेवारी २०२६ ला अर्जुन शर्मा याने मॅरीलँड शहर पोलिसांकडे एक तक्रार नोंदवली. त्याने सांगितलं की त्याची एक्स गर्लफ्रेंड निकिता राव हरवली आहे. त्यानंतर पोलिसांनी निकिताचा शोध घ्यायला सुरुवात केली. ३ जानेवारी २०२६ ला पोलिसांना निकिताचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी असंही सांगितलं होतं की आम्ही त्यानंतर अर्जुन शर्माचा शोध घेतला पण तो फरार झाला होता. या घटनेनंतर निकिता रावच्या वडिलांनी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याशी संपर्क साधून, परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शर्माला अटक करण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची मागणी केली होती. “तो भारतात पळून आला असून कुठेतरी लपून बसला आहे, हे माहीत आहे…” असं निकिताच्या वडिलांनी सांगितलं होतं.

अर्जुन शर्माला आठ महिन्यांनी अटक

जवळपास आठ महिन्यांनी अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर अर्जुन शर्माला आग्र्यातील एका फ्लॅटमधून अटक करण्यात आली. ही माहिती हैदराबाद मधील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली होती. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. पोलिसांनी सांगितलं की निकिताच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही अर्जुन शर्माच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. अमेरिकेत जे घडलं होतं त्याबाबत माहिती घेण्यासाठी आम्ही सीआयडी आणि सीबीआयची मदत घेतली. महिलेच्या वडिलांनी जी तक्रार केली त्या आधारे आम्ही स्वतंत्र FIR दाखल केली होती. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही अर्जुन शर्माला अटक केली अशी माहिती पोलीस निरीक्षक बी. रवी किरण यांनी दिली.

कोण होती निकीता राव?

निकिता राव गोदिशला ही एक कॉर्पोरेट कर्मचारी होती. तिने हेल्थ आणि टेक सेक्टरमध्ये तिची स्वतःची ओळख तयार केली होती. ती कोलंबियातील मॅरीलँडमध्ये असलेल्या व्हेडा हेल्थ कंपनीत डेटा विश्लेषक म्हणून काम करत होती. निकिताने २०२५ मध्ये ही कंपनी जॉईन केली होती. तसंच तिने या कंपनीसाठी जे उत्तम काम केलं त्यामुळे तिला ऑल इन अवॉर्ड देऊन सन्मानितही करण्यात आलं होतं. याच निकिताची जानेवारी २०२६ मध्ये हत्या झाली.