काबूल : गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलचा ताबा घेतला. त्या घटनेला सोमवारी एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात या देशाची अर्थव्यव्यवस्था कमालीची ढासळली असून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आली. तालिबानच्या ताब्याला एक वर्ष पूर्ण झाल्याने तालिबानी अतिरेक्यांनी रायफली उंचावून आणि त्यांच्या अतिरेकी चळवळीचे पांढरे बॅनर फडकावून पायी, सायकल व मोटारसायकलद्वारे विजयी मिरवणूक काढली. ‘इस्लाम चिरंजीव’, ‘अमेरिकेला ठार करा’ अशा घोषणा देत अतिरेक्यांच्या एका गटाने अमेरिकी दूतावासासमोरून कूच केली. या वर्षभरात अफगाणिस्तानची प्रगती खालावली आहे. लाखो अफगाण नागरिक दारिद्र्यात खितपत असून उपासमारीचे संकट आलेले आहे. परकीय मदतीचा ओघ घटून अधोगती सुरू आहे.