‘आधार’च्या माहितीसंचाला गळती लागल्याची बातमी देणाऱ्या पत्रकारावर गुन्हा दाखल झाल्याने खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला ‘घरचा आहेर’ दिला. आधारचा गैरवापर आणि प्रशासनाची अकार्यक्षमता मांडणाऱ्या पत्रकारावर गुन्हे दाखल होत आहेत. हा कोणता न्याय आहे?, आपण बनाना रिपब्लिक सारख्या देशांमध्ये राहतो का?, असा सवालच त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारला विचारला आहे.

‘आधार’बाबतची माहिती अवघ्या ५०० रुपयांमध्ये विकली जात असल्याचे वृत्त देणाऱ्या ट्रिब्यून विरोधात ‘युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ने (यूआयडीएआय) शनिवारी गुन्हा दाखल केला होता. ‘द ट्रिब्यून’ वर्तमानपत्र, संबंधित बातमी देणाऱ्या पत्रकार रचना खैरा आणि आधारच्या माहितीपर्यंत पोहोचण्यासाठी एका निनावी ग्रुपने व्हॉट्सअॅपवर खैरा यांना माहिती देणाऱ्या तिघांचा आरोपींमध्ये समावेश होता.

‘आधार’च्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण करणाऱ्या पत्रकारावरच गुन्हा दाखल झाल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. भाजपचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरवरुन भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘आधार’चा गैरवापर आणि अकार्यक्षम यंत्रणेचे सत्य मांडणाऱ्या पत्रकारावर गुन्हा दाखल होतो ही दुर्दैवी बाब आहे. आपण बनाना रिपब्लिकसारख्या देशात राहतो का?, हा कोणता न्याय आहे?, देशात फक्त वैर आणि सूडाचे राजकारण सुरु आहे का?, अशा प्रश्नांचा भडीमारच त्यांनी भाजपवर केला. देशासाठी आणि समाजासाठी प्रामाणिकपणे पुढे येऊन काम करणाऱ्यांनाच आता अशी वागणूक दिली जाते, अशी टीका त्यांनी केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेणाऱ्या एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाचा मी आभारी आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या यंत्रणा, सुप्रीम कोर्ट याची दखल घेतील आणि तातडीने यावर तोडगा काढतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’नेही या घटनेचा निषेध केला आहे. या प्रकरणात आता सरकारने तातडीने हस्तक्षेप करुन पत्रकारावर दाखल झालेला गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी ‘एडिटर्स गिल्ड’ने केली आहे. पत्रकारावर गुन्हा दाखल करण्याऐवजी यंत्रणांनी या प्रकाराची सविस्तर चौकशी करुन असे गैरप्रकार रोखण्याची गरज होती, असेही गिल्डने म्हटले आहे.

दरम्यान, रचना खैरा यांनी देखील या वृत्तावर रविवारी संध्याकाळी प्रतिक्रिया दिली होती. माझ्या वृत्ताची यूआयडीएआयने दखल घेऊन काही तरी कारवाई केली याचा मला आनंद आहे. मी हा एफआयआर कमावला आहे, त्यांनी सांगितले.