scorecardresearch

आकार पटेल यांना देश सोडण्यास मनाई

न्यायालयाच्या परवानगीशिवाय अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाचे प्रमुख आकार पटेल यांनी देश सोडू नये, असे आदेश दिल्लीच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी दिले.

पीटीआय, नवी दिल्ली : न्यायालयाच्या परवानगीशिवाय अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाचे प्रमुख आकार पटेल यांनी देश सोडू नये, असे आदेश दिल्लीच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी दिले. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने गुरुवारी आकार पटेल यांच्याविरोधात सीबीआयने काढलेली ‘लुकआऊट नोटीस’ रद्द करून त्यांना परदेश प्रवासाला परवानगी दिली होती. मात्र दिल्लीच्या विशेष न्यायालयाकडून हा निर्णय बदलण्यात आला.

अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निकालावर सीबीआयने विशेष न्यायालयात पुनरीक्षण अर्ज दाखल केला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष स्नेही मान यांनी सांगितले की, सीबीआयच्या पुनरीक्षण अर्जावर औपचारिक उत्तर देण्यासाठी पटेल यांना योग्य संधी देणे आवश्यक आहे. सीबीआयचे वकील निखिल गोयल यांनी शुक्रवारी विशेष न्यायालयाला सांगितले की, कनिष्ठ न्यायालयाचा आदेश चुकीचा असल्याने पुनरीक्षण अर्ज दाखल करण्यात आला. कनिष्ठ न्यायालयाने त्यांची माफी मागण्याचेही निर्देश दिले आहेत. त्यावर न्यायालयाने पटेल यांना परवानगीशिवाय देश सोडण्यास मनाई केली आणि पुढील आठवडय़ात या प्रकरणी युक्तिवाद करण्याचे निर्देश दिले.

प्रकरण काय?

परदेशी अनुदान नियमन कायद्याच्या उल्लंघनाच्या आरोपावरून सीबीआयने आकार पटेल यांच्याविरोधात बुधवारी कारवाई केली होती़. पटेल हे बंगळूरु विमानतळावरून अमेरिकेला जाण्यासाठी निघालेले असताना सीबीआयने त्यांना प्रवासास मनाई केली़. त्याविरुद्ध त्यांनी दिल्लीतील न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने ‘लुकआऊट नोटीस’ रद्द करण्याचे निर्देश दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aakar patel banned leaving country court without permission ysh

ताज्या बातम्या