दिल्लीकरांना मोफत पाणी पुरविण्याचे आणि वीजदरात निम्म्याने कपात करण्याचे आम आदमी पक्षाने दिलेले आश्वासन पक्षाने सत्तेवर आल्यावर लगेचच प्रत्यक्षात आणले आहे. येत्या एक मार्चपासून दिल्लीतील प्रत्येक कुटुंबाला २० हजार लिटर पाणी मोफत पुरविण्यात येणार असून, ४०० युनिटपर्यंत वीज वापरासाठीचे दरही निम्म्याने कमी करण्यात आले आहेत.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी गुरुवारी याची घोषणा केली. दिल्लीकरांना या सुविधा दिल्यामुळे दिल्ली सरकारवर दरवर्षी १६७७ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. या घोषणेसोबतच सिसोदिया यांनी दिल्लीकरांना पाणी आणि वीज जपून वापरण्याचे आवाहनही केले आहे. जर महिन्याचा वीजवापर ४०० युनिटपेक्षा जास्त असेल, तर संबंधित ग्राहकाला वीजबिलात कोणतीही सूट मिळणार नसून, त्याला संपूर्ण वीजवापराचे शुल्क कोणत्याही अनुदानाशिवाय भरावे लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.