महाराष्ट्रातील अनेक आमदार आणि मंत्र्यांना ईडीच्या नोटीसा मिळाल्या आहेत. तर, बंगालमध्येही काही नेत्यांना ईडीने नोटीसा बजावल्या आहेत. त्यात आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला देखील ईडीने नोटीस बजावली आहे. मोदीजींच्या आवडत्या केंद्रीय यंत्रणेकडून लव्ह लेटर आलंय, असं म्हणत आपचे आमदार राघव चड्ढा यांनी टोला लगावला आहे.

भाजपाच्या राजकीय जादूटोण्याचा पर्दाफाश करण्यासाठी आज दुपारी १.३० वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती चड्ढा यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील ईडीच्या नोटीसचा प्रेम पत्र असा उल्लेख केला होता. परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर राऊतांनी हे विधान केलं होतं. “ईडीची नोटिस म्हणजे राजकीय नेत्यांसाठी डेथ वॉरंट नसून प्रेमपत्र आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर अशा प्रेमपत्रांची संख्या वाढली आहे. अनिल परबांना भाजपा नेत्यांनी टारगेट केलंय. मात्र, परब नोटिसला उत्तर देतील आणि ईडीला तपासात सहकार्य करतील,” असेही राऊत म्हणाले होते. तसेच “एकतर भाजपचा माणूस ईडीमध्ये डेस्क ऑफिसर आहे किंवा ईडीचा अधिकारी भाजपच्या कार्यालयात काम करत आहे,” असा टोला राऊतांनी यावेळी लगावला होता.

दरम्यान, ईडीच्या नोटिशीनंतर आता आम आदमी पक्षाची भूमिका काय असेल आणि नेमकी कोणत्या कारणावरून नोटीस बजावण्यात आली आहे, यासंदर्भात राघव चड्ढा पत्रकार परिषदेत खुलासा करणार आहेत.