आम आदमी पक्षाला (AAP) लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. दिल्ली आणि पंजाबमधील सत्ता काबिज केल्यानंतर आणखी एका राज्यात विजय मिळवल्यास ‘आप’ला अधिकृतरित्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गोव्यात ‘आप’ला नुकताच राज्य मान्यताप्राप्त पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. फेब्रुवारीत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर आयोगाकडून ‘आप’ला हा दर्जा देण्यात आला आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर केजरीवाल यांच्याकडून पक्ष कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले. “या यशासाठी कठोर मेहनत घेतलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे खूप अभिनंदन. ‘आप’वर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचे आभार मानतो”, असे केजरीवाल यावेळी म्हणाले.

“मोदींनी उद्योजक मित्रांची १० लाख कोटींची कर्ज माफ केली”, अरविंद केजरीवालांची भाजपाच्या देणगीबाबत ‘ही’ मोठी मागणी

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाठवलेले पत्र ट्वीट करुन केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे. आम आदमी पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीत दोन जागा जिंकल्या होत्या. एकुण मतांच्या ६.७७ टक्के मतं ‘आप’ला या निवडणुकीत मिळाली होती.

विश्लेषण : दिल्ली सरकारचे नवे मद्य धोरण काय आहे? या धोरणाला विरोध का होत आहे?

आम आदमी पक्षाने पंजाब विधानसभा निवडणुकीत एकुण ११७ पैकी ९२ जागा जिंकत सत्ताधारी काँग्रेसचा धुव्वा उडवला होता. राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या अकाली दलाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले होते. सत्ताधारी काँग्रेसने केवळ १८ जागा जिंकल्या होत्या. दिल्ली, पंजाब सारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये सत्ता मिळवल्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये भाजपासह इतर प्रमुख पक्षांसमोर ‘आप’चे मोठे आव्हान उभे असणार आहे.