Manoj Jha criticize Aamir Khan: नीट पेपरफुटीप्रकरणी उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना देशभरातून पाठिंबा वाढत आहे. वांगचुक आणि दिपकेंच्या आंदोलनाच्या समर्थनात अनेक राजकीय नेते, सिने कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते देखील मैदानात उतरले आहेत. वांगचुक यांनी उपोषण सोडावे, अशी मागणी होत असली तरी वांगचुक उपोषणावर ठाम आहेत. प्रसिद्ध थ्री इडियट्स चित्रपटातील रँचो पात्र सोनम वांगचुक यांच्या जीवनावर आधारित नसल्याचा खुलासा नुकताच अभिनेता आमिर खान यांनी केला आहे. यावरुन आता विविध प्रतिक्रिया समोर येत असून, “आमिर खान यांना आत्ताच का आठवलं?”, असा सवाल आरजेडी राज्यसभा खासदार मनोज झा यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाला होता आमिर खान?

थ्री इडियट्स चित्रपटात चतुरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ओमी वैद्य यांना सोनम वांगचुक यांच्या समर्थनात मैदानात उतरत त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती. मला फुन्सुक वांगडूला मरताना पाहायचं नाही, असे वैद्य म्हणाला होता. दरम्यान, ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये बोलताना आमिर खान यांनी फुन्सुक वांगडू किंवा रँचो पात्राबाबत गैरसमज झाल्याचे स्पष्ट केले. “सिनेमा करत असताना सोनम वांगचुक यांच्याबद्दल माहिती नव्हते. ओमीचा व्हिडीओ पाहिला पण त्यात तो चुकलाय, त्याला कदाचित वाटले असेल पण, मला राजकुमार हिरानी किंवा लेखक अभिजीतला याबाबत माहिती नव्हते”, असे आमिर खान म्हणाले. याबाबत आता खासदार मनोज झा यांनी प्रश्न उपस्थित केला.

आमिर खानवर टीका

“आमिर खान यांना हे सांगण्यासाठी किती वर्षे लागली. मला नाही आठवत किती वर्षांपूर्वी हा सिनेमा आला होता. पण, आजवर तर असेच सांगितलं जात होतं, पोराबाळांना देखील हेच माहिती होते, आणि आज तुम्हाला लक्षात आलं की हे बोलायला हवं? यातून एक लक्षात येतं की, सत्तेपुढे पाठीचा कणा ताठ ठेवणे सर्वांसाठी सोपा पर्याय नाही”, अशा शब्दात मनोज झा यांना आमिर खानवर टीका करताना मत व्यक्त केले. “ज्या सरकारमधील संवेदना लुप्त झाली असेल, त्यांच्यापुढे उपोषणाचा पर्याय काम करत नाही”, असेही झा पीटीआयशी बोलताना म्हणाले.

वांगचुक यांनी उपोषण सोडण्याची विनंती

“आमरण उपोषण, उपोषण यासारखी आंदोलने ज्या सरकारमध्ये संवेदना आहे त्यांच्यावर फरक पाडत असते. ज्या सरकारमधील संवेदना संपली असेल किंवा मृत झाली असेल तिथं लोकशाहीचे हत्यारं काम करत नाहीत. लढाई मोठी आहे, प्रवास लांबचा आहे, त्यामुळे सध्या सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडावे”, अशी मागणी खासदार झा यांनी पीटीआयशी बोलताना केली.