माझ्याबाबत शंका उपस्थित करणारे लोक पक्षपाती- आमिर खान

नकारात्मक विचार करणारे लोक आरडाओरडा करतात

Aamir Khan , Bollywood, Intolarnce, happy birthday, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
Aamir Khan : इतरांविषयी आणि समाजाविषयी संवेदनशील असणे, ही माझ्यासाठी देशभक्ती असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

काही दिवसांपूर्वी असहिष्णुतेसंदर्भातील वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला अभिनेता आमिर खान याने माझ्याबाबत शंका उपस्थित करणारे लोक पक्षपाती असल्याचे सांगितले. तो सोमवारी त्याच्या ५१व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होता. माझ्यावर करण्यात येणाऱ्या नकारात्मक टीकेला उत्तर द्यायचे नाही, हेच आपले सध्याचे धोरण असल्याचे त्याने यावेळी स्पष्ट केले. माझ्याबाबतीत शंका उपस्थित करणाऱ्या लोकांचा माझ्याविषयीचा दृष्टीकोन पूर्वग्रहदुषित आहे. त्यामुळे मी काहीही केले तरी ते शंका उपस्थित करणारच. तुम्ही कोण आहात, आयुष्यात तुम्ही काय केले आहे, हे लक्षात न घेता लोक तुमच्याबद्दल शंका उपस्थित करतात. मात्र, या सगळ्यामुळे तुम्ही नकारार्थी विचार करता कामा नये, असे आमिरने म्हटले. तुम्ही सकारात्मक राहिले पाहिजे आणि आपण काय करतो त्याबद्दल सजग राहिले पाहिजे. सकारात्मक बाबी आणि तुमच्याविषयी सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांवर तुम्ही लक्ष केंद्रित केले पाहिजे. नकारात्मक विचार करणारे लोक आरडाओरडा करतात. त्यामुळे त्यांचा आवाज जास्त ऐकू येतो. मात्र, बहुतांश लोक सकारात्मक असतात, असे आमिरने म्हटले.
यावेळी आमिरने देशभक्तीसंदर्भात बोलताना म्हटले की, मनात देशाविषयी प्रेम असणे गरजेचे आहे. इतरांविषयी आणि समाजाविषयी संवेदनशील असणे, ही माझ्यासाठी देशभक्ती असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Aamir khan people who questioned me are those who are biased against me