PM Narendra Modi and Mallikarjun Kharge Viral Video: राजकारणात संसदेत आणि माध्यमांसमोर एकमेकांवर जहाल टीका करणारे राजकारणी खासगी आयुष्यात मात्र एकमेकांशी मैत्रभाव जपून असतात, असे सांगितले जाते. याचे ताजे उदाहरण सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये पाहायला मिळाले. या समारंभाला पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, सेलिब्रिटी आणि उद्योगपती उपस्थित होते. पंतप्रधान मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्यातील हास्यविनोदाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अनुपस्थित आहेत. त्यावरून काँग्रेसचे नेते त्यांच्यावर जोरदार टीका-टिप्पणी करताना दिसतात. मात्र या समारंभाच्या निमित्ताने त्यांनी काही सेकंद एकमेकांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींबद्दल एक टिप्पणी केली, ज्यानंतर ते एकमेकांना टाळी देताना दिसले.
पंतप्रधान मोदी यांनी हे रेवती सुळे यांच्या रिसेप्शन सोहळ्याला आले असताना त्यांना काँग्रेसचे नेते उभे असल्याचे दिसले. त्यांनी स्वतःहून नेत्यांची चौकशी केली. खासदार प्रियांका गांधी यांना उद्देशून ते म्हणाले की, तुम्ही कशा आहात? यावर प्रियांका गांधी वाड्रा यांनी ‘मी ठीक आहे सर, तुम्ही कसे आहात?’, असे उत्तर दिले.
प्रियांका गांधी यांच्या प्रतिसादानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी नेहमी असतो तसाच आहे.” पंतप्रधान मोदींच्या वाक्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “भाई साहब, आप थोडा बदल गये हो.” खरगे ही टिप्पणी नेमकी कोणत्या संदर्भात बोलले, हे या व्हिडीओतून कळू शकले नाही. मात्र या टिप्पणीनंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
पंतप्रधान मोदींनी खरगेंच्या टिप्पणीवर “खरंच की काय?” एवढेच म्हटले आणि तेही हास्यविनोदात सहभागी झाले. मल्लिकार्जुन खरगेंना टाळी देत ते पुढे निघून गेले.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर जेन-झी पिढीशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इन्स्टाग्रामवर सक्रिय झाले असून त्यांचे सेल्फी व्हिडीओ चांगलेच चर्चेत आले होते. यावरून मल्लिकार्जुन खरगे यांनी ही टिप्पणी केली असावी, असा कयास सोशल मीडियावर बांधला जात आहे.
२० जुलैच्या मोर्चानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वेळा इन्स्टाग्रामवर रात्रीच्या वेळेस सेल्फी व्हिडीओ पोस्ट केले. जेन-झी पिढीशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या जवळ जाण्यासाठी त्यांनी हा प्रयोग केल्याचे सांगितले जात होते. एवढेच नाही तर मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्यांनी इतर मंत्र्यांना इन्स्टाग्रामवर सक्रिय होण्याच्या सूचना दिल्या होत्या.
Rahul Gandhi & Amit Shah , under the same roof… ?? pic.twitter.com/oIOMBUflyB
— Arthur Fleck (@montana9_) August 10, 2026
अमित शाह आणि राहुल गांधी एकाच ठिकाणी
रेवती सुळे यांच्या रिसेप्शनच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शाह आणि राहुल गांधी एकाच ठिकाणी आलेले पाहायला मिळाले. वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर जात असताना दोन्ही नेते एकाच ठिकाणी उभे होते. त्यानंतर अमित शाह स्टेजवर गेले. या घटनेचाही व्हिडीओ व्हायरल होत आहे.
