अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने केवळ काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांचीच झोप उडवलेली नाही, तर डाव्या पक्षांच्या गोटातही चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे, याचा प्रत्यय रविवारी आला. ‘आप’ हा काँग्रेस आणि भाजपसारख्या भांडवलशाही पक्षांना पर्याय असेल मात्र डाव्या पक्षांना तो पर्याय ठरू शकत नाही, असे विधान माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी केले. केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या मोफत पाणी योजनेवरही त्यांनी टीका केली.
करात म्हणाले, ‘आप’मुळे देशातील राजकीय वातावरण ढवळले गेले आहे, हे खरे आहे. केवळ डाव्या पक्षांशी सहानुभूती बाळगणाऱ्या नव्हे तर उजव्या विचारसरणीच्या मतदारांनीही ‘आप’ला कौल दिला आहे. काँग्रेस आणि भाजपसारख्या भांडवलशाही पक्षांसमोर त्यांनी मोठे आव्हान उभे केल्याचे दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत दिल्लीत हा नवा पक्ष महत्त्वाची भूमिका बजावेल, यात शंका नाही. मात्र डाव्या पक्षांची ध्येयधोरणे वेगळी असल्याने ‘आप’ हा आम्हाला पर्याय ठरणार नाही. ‘आप’ची सर्व धोरणे अद्याप पुरेशी स्पष्ट झाली नाहीत. उदारमतवाद आणि जातीयवाद याबाबत त्यांची काय भूमिका आहे, याबाबत अद्याप संदिग्धता आहे. याबाबतची त्यांची मते आम्ही जाणून घेऊ इच्छितो.
दिल्लीकरांना दरमहा २० हजार लिटर पाणी मोफत देण्याच्या ‘आप’च्या निर्णयावर करात यांनी नाराजी व्यक्त केली. दिल्लीकरांना मोफत पाणी देण्याची घोषणा आकर्षक आहे, मात्र दिल्लीतील ३० टक्के नागरिकांकडे अद्याप पाणी तसेच विजेची जोडणी नाही, त्यामुळे दिल्ली सरकारच्या या नव्या योजनांचे लाभार्थी फार कमी प्रमाणात आहेत, असा दावा त्यांनी केला.
आम्ही त्यांच्या संपर्कात..
देशभरातील लोक आता काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या राजकारणाला विटले असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसेतर व भाजपेतर असणाऱ्या धर्मनिरपेक्ष पक्षांची मोट बांधण्याचा आमचा प्रयत्न आहे. यात मोडणाऱ्या सर्व पक्षांच्या आम्ही संपर्कात असून, पुढील महिनाअखेपर्यंत या नव्या आघाडीला आकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.