scorecardresearch

राज्यसभेसाठी ‘आप’कडून हरभजनसिंग, राघव चड्ढा; जुलैपर्यंत सभागृहातील चित्र बदलणार!

पंजाबमधून राज्यसभेवर निवडून गेलेले ५ सदस्य ९ एप्रिल रोजी निवृत्त होत असून त्यासाठी ३१ मार्च रोजी निवडणूक होणार आहे.

नवी दिल्ली : पंजाबमध्ये सत्तेवर आलेल्या आम आदमी पक्षाचे (आप) नवे पाच सदस्य मार्चच्या अखेरीस राज्यसभेवर निवडून जाऊ शकतील. पाचही उमेदवारांच्या नावाची ‘आप’ने सोमवारी घोषणा केली असून त्यामध्ये माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि दिल्लीचे आमदार व पंजाबचे पक्षप्रभारी राघव चड्ढा यांचा समावेश आहे. चढ्ढा हे राज्यसभेतील सर्वात तरुण (वय ३३) खासदार ठरतील!

पंजाबमधून राज्यसभेवर निवडून गेलेले ५ सदस्य ९ एप्रिल रोजी निवृत्त होत असून त्यासाठी ३१ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. सोमवारी (२१ मार्च) उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. हरभजन सिंग व राघव चढ्ढा यांच्यासह ‘’आयआयटी-दिल्ली’’तील प्राध्यापक संदीप पाठक, ‘’लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’’चे (एलपीयू) संस्थापक अशोक मित्तल आणि उद्योजक संजीव अरोरा यांनीही विधानसभा सचिवालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरला. यावेळी नवनियुक्त मुख्यमंत्री भगवंत मान हेही उपस्थित होते. सध्या राज्यसभेत ‘’आप’’चे ३ सदस्य असून पक्षाचे संख्याबळ ८ वर पोहोचेल.

अकाली दल प्रतिनिधित्वाविना!

गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंजाबमधील ११७ पैकी ९२ जागा ‘’आप’’ने जिंकल्या. त्यामुळे ‘’आप’’चे पाचही सदस्य राज्यसभेवर निवडून येण्यात कोणताही अडचण नसेल. ९ एप्रिल रोजी शिरोमणी अकाली दल व काँग्रेसचे २ आणि भाजपचा १ सदस्य निवृत्त होत आहे. त्यामध्ये अकाली दलाचे नरेश गुजराल, काँग्रेसचे प्रतापसिंग बाजवा यांचा समावेश आहे. बाजवा आता विधानसभेचे सदस्य बनले असून त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ४ जुलै रोजी अकाली दल व काँग्रेसचा प्रत्येक खासदार निवृत्त होत असून त्यामध्ये काँग्रेसच्या अंबिका सोनी यांचा समावेश आहे. या दोन रिक्त जागांसाठी स्वतंत्र अधिसूचना काढली जाईल. अकाली दलाने विधानसभा निवडणुकीत फक्त ३ जागा जिंकल्यामुळे पुढील सहा वर्षे राज्यसभेत अकाली दलाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एकही सदस्य नसेल!

राज्यातून ६ जागा रिक्त

महाराष्ट्रातूनही ४ जुलै रोजी ६ सदस्यांची मुदत संपुष्टात येत असून त्यामध्ये केंद्रीयमंत्री व भाजपचे खासदार पीयुष गोयल, विनय सहस्रबुद्धे, विकास महात्मे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल, काँग्रेसचे पी. चिदंबरम आणि शिवसेनेचे संजय राऊत यांचा समावेश आहे.

काँग्रेस विरोधीपक्ष नेतेपद गमावण्याचा धोका?

२०२२ मध्ये राज्यसभेतील ७० सदस्य निवृत्त होत असून एकूण ६६ सदस्यांची मुदत जुलैपर्यंत संपुष्टात येत आहे. त्यामुळे पुढील चार महिन्यांमध्ये वरिष्ठ सभागृहातील चित्र बदललेले असेल. नुकत्याच झालेल्या पाच विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झाल्याने काँग्रेसच्या राज्यसभेतील किमान ८ जागा कमी होईल. २ एप्रिल रोजी काँग्रेस आसाम व पंजाबमधून प्रत्येक २ व हिमालच प्रदेशमधून १ (आनंद शर्मा) अशा ५ जागा गमावेल. ४ जुलै रोजी पंजाब, उत्तर प्रदेश (कपिल सिबल), उत्तराखंड या तीन राज्यांमधून प्रत्येक १ जागा कमी होईल. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ ३४ वरून २६ वर येईल. राज्यसभेतील सदस्यसंख्येच्या किमान १० टक्के संख्याबळ असलेल्या पक्षाला विरोधीपक्ष नेतेपद मिळते. सभागृहातील विद्यमान सदस्यसंख्या २३७ आहे. सध्या काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे विरोधीपक्ष नेते असून हे पद टिकवण्यासाठी काँग्रेसचे संख्याबळ किमान २४ असावे लागेल. काँग्रेससाठी विरोधीपक्ष नेतेपद गमावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. मध्य प्रदेशात ३ जागा रिक्त होत असून त्यापैकी एक काँग्रेसची आहे. कर्नाटकमधील ४ जागांपैकी २ काँग्रेसच्या आहेत. या दोन्ही ठिकाणी भाजपची सरकारे आहेत. राजस्थानमधून ४ जागा रिक्त होत असून तिथे मात्र काँग्रेसचे सरकार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aap declare harbhajan singh raghav chadha for rajya sabha seats zws

ताज्या बातम्या