पीटीआय, बंगळुरू : काही महिन्यांवर आलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष (आप) ६० मतदान केंद्रांवर आपले लक्ष केंद्रित करेल. त्यासाठी स्वकर्तृत्वावर जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांचा शोध पक्ष घेत असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्ली महापालिकेत भाजपकडून सत्ता हिरावून घेतल्याने व गुजरात विधानसभा निवडणुकीत लक्षवेधी कामगिरी केल्याने पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे पक्षाच्या कर्नाटकातील नेत्यांचे म्हणणे आहे. कर्नाटकात पुढील वर्षी मेपर्यंत विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. बंगळुरूचे माजी पोलीस आयुक्त व पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्कर राव यांनी शुक्रवारी सांगितले, की गुजरात निवडणुकीत विजयी झालेल्या ‘आप’च्या पाच उमेदवारांना धनशक्तीचे अथवा दंडशक्तीचे समर्थन नव्हते. ते स्वकर्तृत्वावर विजयी झाले आहेत. अशाच उमेदवारांना आम्ही कर्नाटकमध्ये पक्षाची उमेदवारी देणार आहोत.

राव यांनी सांगितले, की पक्ष कर्नाटकातील सर्व २२४ विधानसभा मतदारसंघात नवे व चांगले उमेदवार उभे करेल. त्यापैकी ५० ते ६० विजयाची खात्री असलेल्या जागांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. गुजरातमध्ये केलेल्या कामगिरीपेक्षाही कर्नाटक विधानसभा निवडणुकीत अधिक चांगली कामगिरी करू, याबाबत आम्हाला आशा वाटते. पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रचारामुळे पक्षाच्या विजयाची शक्यता वाढणार आहे. तसेच पक्षाची स्वीकारार्हता वाढेल व नवी संधीही प्राप्त होईल. कर्नाटकात काँग्रेस तसेच भाजप व इतर पक्षांच्या आघाडय़ांचे प्रारूप नाकारले गेले आहे. त्यामुळे या राज्याला पूर्णपणे नव्या प्रारूपाची गरज आहे. ‘आप’ हे नवे प्रारूप देऊ शकतो. मोदींची जादू हिमाचल प्रदेशात चालली नाही, याचा आम्हाला आनंद झाला आहे. त्यामुळे त्यांची जादू कर्नाटकातही चालणार नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap efforts to good performance gujarat in karnataka special focus on 60 seats ysh
First published on: 10-12-2022 at 00:00 IST