दिल्ली विधानसभेत केजरीवाल सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. या ठरावावेळी केजरीवाल सरकारच्या बाजुने ५८ मते ( १ विधानसभा अध्यक्ष अर्थात एकूण ५९ मते ) मिळाली आहेत. तर, विरोधात शुन्य मते पडली आहे. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांवर निशाणा साधत मोठं व्यक्तव्य केलं आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना अटक केली, तर गुजरातमध्ये आपचे सरकार स्थापन होईल, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

“सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकल्यापासून गुजरामध्ये आम आदमी पक्षाचा जनाधार चार टक्क्यांनी वाढला आहे. मनीष सिसोदियांना अटक केली तर, गुजरामध्ये आमचा जनाधार ६ टक्क्यांनी वाढेल. जर, सिसोदियांना दुसऱ्यांदा अटक झाली, तर सरकार स्थापन होईल,” असं अरविंद केजरीवाल विधानसभेला संबोधित करताना म्हणाले.

“आपच्या ४९ आमदारांवर गुन्हे दाखल”

आपच्या आमदारांवर आणि स्वत:वर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती देताना अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की, “माझ्यावर १६ गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी १२ मधून निर्दोष मुक्तता झाली आहे. मनीष सिसोदियांवर १३ गुन्हे दाखल असून, १० मधून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. तर, दिनेश मोहनियांवर १० खटले दाखल आहेत. त्यातील ९ मधून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. आपच्या ४९ आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. त्यांची यादी आमच्याकडे आहे. प्रत्येक कामात भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल होतात. मात्र, एकही सिद्ध होत नाही,” असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केलं.

“१२ आमदारांना प्रत्येकी २० कोटींची ऑफर”

“भाजपाला वाटते की ते आमचे सर्व आमदार विकत घेऊ शकतात. पण, आपचे आमदार विकले जाणार नाहीत. आमच्या ४० आमदारांना विकत घेण्यासाठी ८०० कोटी रूपये त्यांनी ठेवले होते. तर, १२ आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपयांची ऑफर दिली होती. मात्र, आमच्या पक्षाचा एकही आमदार विकला गेला नाही,” असे म्हणत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भाजपावर शरसंधान साधलं आहे.