LPG Crisis In India: देशात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा तुटवडा वाढत असल्याने अनेक शहरांतील हॉटेल्स व रेस्टॉरंट्स बंद पडण्याच्या स्थितीत आले आहेत. काही ठिकाणी हॉटेल्स सुरू असली तरी मर्यादित पदार्थच ग्राहकांना दिले जात आहेत. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्त्रायल युद्धाचा फटका भारतालाही बसत असल्याचे चित्र दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन एलपीजी टंचाईचा मुद्दा उपस्थित केला आणि केंद्र सरकारवर तीव्र टीका केली.
“देशावर संकट”
पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल म्हणाले की, देशभरात घरे, रेस्टॉरंट्स आणि उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एलपीजीची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दैनंदिन उत्पादन सुमारे ५० टक्क्यांनी घटल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. भारतात वापरल्या जाणाऱ्या एलपीजीपैकी सुमारे ६० टक्के गॅस आयात केला जातो आणि त्यातील जवळपास ९० टक्के पुरवठा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतो. सध्याच्या युद्धामुळे हा पुरवठा कमी झाल्याने देशात संकट निर्माण झाले असल्याचा दावा त्यांनी केला.
मुंबईतील ५० टक्के हॉटेल्स बंद होतील!
केजरीवाल म्हणाले की, या टंचाईचा सर्वाधिक फटका हॉटेल व रेस्टॉरंट उद्योगाला बसत आहे. मुंबईत जवळपास २० टक्के हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आधीच बंद पडली आहेत आणि पुढील दोन दिवसांत हा आकडा ५० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. लग्नाचा हंगाम सुरू असल्याने अनेक कुटुंबांना लग्न समारंभ पुढे ढकलावे लागू शकतात, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
एक कोटी लोक बेरोजगार होणार!
एलपीजी संकटामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि संबंधित उद्योगांमध्ये काम करणाऱ्या सुमारे एक कोटी लोकांच्या रोजगारावर गदा येऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. याशिवाय देशात एलपीजीचा काळाबाजार वाढत असल्याचाही आरोप त्यांनी केला. इराणवर इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचे ते म्हणाले.
केंद्र सरकारवर टीका करताना केजरीवाल म्हणाले की, गेल्या ७५ वर्षांपासून भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आधार असलेले अलिप्तता धोरण कमकुवत करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी इस्रायलला उघड पाठिंबा दिल्यामुळे त्याचा परिणाम भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
