नवी दिल्ली : स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अडकवण्याचे भाजपचे कारस्थान असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी शुक्रवारी केला. दरम्यान, या प्रकरणी केजरीवाल यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपच्या नेत्या निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत केली.

मालिवाल यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरचे तपशील शुक्रवारी उघड झाले. दुसरीकडे, केजरीवाल यांच्या निवासस्थानी १३ मे रोजीच्या घटनेची एक चित्रफीत प्रसिद्ध झाली. त्यानंतर ‘आप’च्या नेत्या आतिशी यांनी शुक्रवारी संध्याकाळी तातडीने पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

आतिशी यांनी सांगितले की, मालिवाल भेटीची वेळ न घेताच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. त्यांनी केजरीवाल यांना भेटण्याचा आग्रह केला, त्यावेळी विभव कुमार यांनी त्यांना मुख्यमंत्री व्यग्र असल्याचे सांगितले. त्यानंतर, मालिवाल यांनी आरडाओरडा करत आत शिरण्याचा प्रयत्न केला असे आतिशी म्हणाल्या.

हेही वाचा >>> VIDEO : “मी माझा मुलगा तुम्हाला सोपवतेय”; सोनिया गांधींची रायबरेलीच्या जनतेला भावनिक साद!

आपल्याला क्रूरपणे मारहाण झाली असा आरोप स्वाती मालिवाल यांनी एफआयआरमध्ये केला आहे. मात्र, चित्रफितीत पूर्ण वेगळे वास्तव दिसत आहे असे आतिशी म्हणाल्या. त्यांनी विभव कुमारला धमकी दिल्याचे चित्रफितीत दिसते असे आतिशी म्हणाल्या. विभव यांनी मालिवाल यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, घटनेचे पुनर्निर्माण करण्यासाठी दिल्ली पोलीस मालिवाल यांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले.

आतिशी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर

आतिशी यांच्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया देताना मालिवाल आपने आपल्या भूमिकेवर घुमजाव केल्याचा आरोप केला. त्यांनी एक्सवर लिहिले की, काल आपमध्ये आलेले नेते माझ्यासारख्या २० वर्षांपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला भाजपचा एजंट ठरवले आहे. दोन दिवसांपूर्वी पक्षाने पत्रकार परिषदेत सत्य स्वीकारले होते, आज त्यांनी घुमजाव केले आहे.

विभव कुमारकडून जबर मारहाण

स्वाती मालिवाल यांनी पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, विभव कुमारने मला सात ते आठ वेळा लाथा आणि झापड मारल्या. मासिक पाळी सुरू असल्याचे आणि वेदना होत असल्याचे सांगूनही तो मारहाण करायचे थांबला नाही, तसेच मारहाण होत असताना कोणीही मदतीसाठी आले नाही. विभव कुमारने मला वारंवार जबर मारहाण केली. त्यामुळे मला चालतानाही त्रास होत आहे. मला शिवीगाळही करण्यात आली. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ आहे.

आज एक चित्रफीत समोर आली आहे. त्यातून मालिवाल यांचे खोटे उघड झाले आहे. एफआयआरमध्ये त्यांनी असे म्हटले की, त्यांना क्रूरपणे मारहाण झाली आणि त्यांना वेदना झाल्या, त्यांच्या शर्टाची बटणे तुटली. समोर आलेल्या चित्रफितीत संपूर्ण वेगळे वास्तव दिसत आहे. – आतिशी, मंत्री, दिल्ली

मालिवाल मारहाण प्रकरणी अरविंद केजरीवाल काहीही बोलत नाहीत. या प्रकरणी केजरीवाल यांनी निवेदन प्रसिद्ध करावे आणि त्यांच्या निवासस्थानी मालिवाल यांना झालेल्या मारहाणीबद्दल माफी माफावी.

निर्मला सीतारामनकेंद्रीय मंत्री