AAP Leader Lucky Oberoi Murder: पंजाबमधील आम आदमी पक्षाचे (आप) पदाधिकारी लकी ओबेरॉय यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जालंधर शहराच्या पॉश मॉडेल टाऊन भागातील एका गुरुद्वाराबाहेर शुक्रवारी (०६ फेब्रुवारी) पहाटे ही घटना घडली. ओबेरॉय ‘थार’ गाडीत बसले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
थारमध्ये असताना झाडल्या गोळ्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओबेरॉय त्यांच्या ‘थार’ गाडीत बसले असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
क्लोज रेंजवरुन केलं टार्गेट
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन हल्लेखोर दुचाकीवरु आले होते. सकाळी ७.५५ च्या सुमारास लकी ऑबेरॉय गुरुद्वारातून बाहेर आल्यानंतर कारमध्ये बसल्यावर हल्लेखोरांनी जवळून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ऑबेरॉय यांच्या पत्नी सीमरज्योत कौर यांनी गेल्या वर्षी आपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.
८-९ राऊंड फायर
“लकी यांना सकाळी आठ वाजता रुग्णालयात आणले. त्यांच्यावर ८ ते ९ राऊंड फायर करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांना सीपीआर देण्यात आला, वेंटिलेटरवर ठेवण्यात आले पण, त्यांचा मृत्यू झाला”, अशी माहिती श्रीराम रुग्णालयाचे डॉक्टर विशाल यांनी माहिती दिली आहे.
जानेवारीतही झाली होती आप नेत्याची हत्या
जानेवारीत देखील एका आप नेत्याची हत्या करण्यात आली होती. झरमल सिंह या आप नेत्याची अमृतसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ०४ जानेवारी २०२६ रोजी एका लग्नाच्या ठिकाणी झरमल सिंह यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. झरमल सरपंच म्हणून कार्यरत होते, अशी माहिती आहे.
