Arvind Kejriwal liquor policy case: दिल्लीतील कनिष्ठ न्यायालयाने पुराव्याअभावी ‘मद्य धोरण प्रकरणा’तून आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना निर्दोष मुक्त केल्यानंतर भाजप नेत्यांनी शुक्रवारी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या निर्दोष सुटकेमुळे त्या वेळच्या दिल्ली सरकारला तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी, भाजप नेत्यांनी अधोरेखित केले की या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया अजूनही सुरू राहू शकते.
भाजप नेते सुधांशु त्रिवेदी यांनी टिप्पणी केली, “पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले आहे. ही एक तांत्रिक बाब आहे. या प्रकरणात सीबीआय पुढील पाऊल उचलेल. निकालाचा तपशीलवार अभ्यास केल्यानंतर पक्ष भूमिका मांडेल. जर आरोप निराधार होते, तर ते निश्चित कसे करण्यात आले, याचाही विचार व्हायला हवा.”
“कायदेशीर प्रक्रिया अद्याप संपलेली नाही”
भाजपचे राष्ट्रीय आयटी प्रमुख अमित मालवीय यांनी ‘एक्स’वर आपले मत व्यक्त करत म्हटले, “दिल्ली उत्पादन शुल्क प्रकरणातील हा निकाल कनिष्ठ न्यायालयाने दिला आहे. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने संबंधित कार्यवाहीदरम्यान कडक आणि निंदनीय निरीक्षणे नोंदवली आहेत. हा निकाल उच्च न्यायालयात टिकतो की नाही, हे पाहणे बाकी आहे. कायदेशीर प्रक्रिया अद्याप संपलेली नाही.”
मालवीय पुढे म्हणाले, “जर अरविंद केजरीवाल इतके प्रामाणिक होते, तर अनियमितता उघड झाल्यानंतर दिल्ली सरकारने धोरण मागे का घेतले आणि त्यात बदल का केले? अनेक फोन आणि सिम कार्ड का नष्ट करण्यात आले? कमिशन ६ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत वाढवताना विक्रेत्यांची संख्या इतकी कमी का करण्यात आली? हे निर्णय गंभीर आणि वैध प्रश्न उपस्थित करतात. हे मुद्दे न्यायालये आणि जनतेसमोर मांडले गेले आहेत.”
मालवीय यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या तत्कालिन सरकारच्या धोरणांवर टीका करताना म्हटले, “सर्वात महत्त्वाचे म्हणजे, केजरीवाल यांच्या ‘एकावर एक मोफत’ योजनेमुळे दिल्लीतील कुटुंबांचे नुकसान झाले. त्यांच्या धोरणांमुळे दारूचे दर वाढले. नैतिकदृष्ट्या दिवाळखोर सरकार चालवल्याबद्दल त्यांना कठोर शिक्षेची गरज आहे. दिल्लीतील लोकांनी आधीच मतपत्रिकेद्वारे आपला निर्णय व्यक्त केला आहे. आता न्यायव्यवस्था त्याची तपासणी सुरू ठेवेल. न्यायालयीन तपासणीचे पुढील स्तर प्रलंबित असल्याने अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे.”
निकालानंतर अरविंद केजरीवाल काय म्हणाले?
दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची राऊज एव्हेन्यू न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंत माध्यमांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, “ हा सत्याचा विजय झाला. नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी सर्वात मोठा राजकीय कट रचला, आम आदमी पक्षाच्या पाच मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकले. भारतातच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला तुरुंगात ठेवण्यात आले. सिसोदियांना दोन वर्षे तुरुंगात ठेवले. केजरीवाल भ्रष्टाचारी आहेत असा आरोप करण्यात, पण मी भ्रष्टाचारी नाही”, असे म्हणताना केजरीवालांना अश्रू अनावर झाले.

