सोमवारी आप नेत्या आतिशी यांनी बाजुला रिकामी खुर्ची ठेऊन मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला होता. यावेळी बोलताना, ज्याप्रमाणे रामायणात भरतने १४ वर्ष प्रभू श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेऊन राज्य केलं, तसंच मीसुद्धा रिकामी खुर्ची ठेऊन चार-पाच महिने दिल्लीचे सरकार सांभाळणार आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता दिल्ली सरकारमधील मंत्री कैलाश गेहलोत यांनी स्व:ची तुलना हनुमानाशी केली आहे. मी अरविंद केजरीवाल यांचा हनुमान आहे, असं ते म्हणाले. खरं तर अरविंद केजरीवाल यांच्याप्रती निष्ठा दाखवण्यासाठी आम आदमी पक्षाचे नेते आता रामायणाचा आधार घेऊ लागले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाले कैलाश गेहलोत?
दिल्ली सरकारमधील मंत्री कैलाश गेहलोत यांनी मंगळवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी बोलताना, आम्ही अरविंद केजरीवाल यांचे काम पुढे नेऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच त्यांनी स्वत:ची तुलना थेट प्रभू श्रीराम भक्त हनुमानाशी केली. आज मंगळवार म्हणजेच हनुमानाचा दिवस आहे. ज्याप्रमाणे हनुमानाने प्रभू श्रीराम यांच्यासाठी एकनिष्ठेने काम केलं, त्याचप्रमाणे मी सुद्धा अरविंद केजरीवाल यांच्यासाठी काम करेन. तसेच सर्व प्रलंबित काम पुढे नेईन, मी अरविंद केजरीवाल यांचा हनुमान आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा – Atishi : दिल्लीचा कारभार आतिशी यांच्या हाती; ‘या’ १६ महिला मुख्यमंत्र्यांनी केलंय विविध राज्यांचं नेतृत्व
पुढे बोलताना त्यांनी अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री बनतील, असा विश्वासही व्यक्त केला. आगामी फेब्रुवारी महिन्यात कदाचित दिल्लीत विधानसभेची निवडणूक होऊ शकते. या निवडणुकीत दिल्लीतील जनता पुन्हा आप आदमी पक्षावर विश्वास दाखवतील. तसेच अरविंद केजरीवाल हे पुन्हा दिल्लीचे मुख्यमंत्री होतील, असे ते म्हणाले.
आतिशी यांनी बाजुला रिकामी खुर्ची ठेऊन स्वीकारला होता पदभार
सोमवारी आप नेत्या आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताना आतिशी यांच्या बाजुला एक रिकामी खुर्ची ठेवण्यात आली. त्यामुळे त्यांच्या कृतीची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. त्यानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी माध्यमांशी बोलताना यामागचं कारणही सांगितलं होतं. “ज्याप्रमाणे रामायणात भरत यांनी प्रभू श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेऊन १४ वर्ष राज्य केलं, त्याप्रमाणे मीसुद्धा पुढचे चार-पाच महिने सरकार चालवणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या सन्मानार्थ मी हा निर्णय घेतला आहे.” पुढे बोलताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पुन्हा विजय मिळेल अशा विश्वासही व्यक्त केला. “मी केवळ आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री असणार आहे. या निवडणुकीत दिल्लीतील जनता पुन्हा आम आदमी पक्षाला बहुमताने निवडून देईल आणि अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री होतील”, असं त्या म्हणाल्या होत्या.
हेही वाचा – अरविंद केजरीवाल यांनी आतिशी मार्लेना यांनाच मुख्यमंत्री पद का दिले? ‘आप’ची मोठी खेळी
भाजपाकडून टीका
दरम्यान, आतिशी यांच्या या निर्णयानंतर भाजपानेही त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. “हा प्रकार म्हणजे संविधानाचा अपमान आहे. यावरून दिल्लीचे सरकार आतिशी नाही, तर अरविंद केजरीवाल रिमोट कंट्रोलद्वारे चालवतील, हे सिद्ध झालं आहे. हा संविधानाबरोबरच मुख्यमंत्री पदाचाही अपमान आहे“, असं दिल्ली भाजपाचे अध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी म्हटलं होतं.