आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्ला खान यांना आज(सोमवार) दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर अमानतुल्ला खान यांच्या बाजून दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.

अमानतुल्ला खान यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) १६ सप्टेंबर रोजी दिल्ली वक्फ बोर्डाच्या भरतीतील अनियमिततेच्या संदर्भात त्यांच्या व त्यांच्या साथीदारांच्या घरांवर दिवसभर छापे टाकल्यानंतर अटक केली होती. अटकेच्या एका दिवसानंतर अमानतुल्ला खान यांना चार दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली होती.

अमानतुल्लाह खान यांच्यानंतर व्यावसायिक भागीदार हमीद अलीलाही अटक; १२ लाख रुपये, पिस्तूल आणि काडतुसे जप्त

त्याच दिवशी, छाप्यांदरम्यान त्यांच्या घरातून विना परवाना पिस्तूल आणि १२ लाख रुपये रोख जप्त केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अमानतुल्ला खान यांचा सहकारी हमीद अली याला अटक केली होती.

तिसऱ्यांदा न्यायालयात केले हजर –

दिल्ली वक्फ बोर्डातील कथित अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली एसीबीने अटक केलेले ‘आप’चे आमदार अमानतुल्ला खान तिसऱ्यांदा न्यायालयात हजर झाले होते. या अगोदर सर्वप्रथम १६ सप्टेंबर रोजी अटक करून १७ सप्टेंबरला त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा एसीबीने १४ दिवसांची कोठडी मागितली होती, पण न्यायालयाने आप आमदाराला ४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयात पाच दिवसांची कोठडी सुनावली होती. आता आज पुन्हा एसीबीने राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर केले, जिथे त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.