आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे माजी कायदामंत्री सोमनाथ भारती यांना ते शरण आल्यानंतर आज सकाळी अटक करण्यात आली. त्यांच्या पत्नीने त्यांच्यावर घरगुती हिंसाचार करून खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप करणारी फिर्याद दाखल केली होती. गेले काही दिवस ते बेपत्ता होते पण अखेर शरण आले. त्यांनी पोलिसांना शरण जावे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले होते. पहाटे चार वाजता त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी सांगितले.
आठवडाभर भारती यांनी अटक टाळली होती पण काल रात्री सर्वोच्च न्यायालयाने त्यांना शरण जाण्यास सांगितल्यानंतर त्यांच्यापुढे दुसरा पर्याय उरला नव्हता. आमदार सोमनाथ भारती यांच्यावर खुनाचा प्रयत्न (कलम ३०७), फसवणूक (कलम ४२०), गुन्हेगारी विश्वासघात (कलम ४०६), पत्नीच्या सहमतीशिवाय गर्भपात (कलम ३१३), स्वत:हून जखमी करणे (कलम ३२४), पत्नीला क्रूरपणे वागवणे (कलम ४९८ अ), धमकावणे (कलम ५०६) अशा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीचे माजी कायदामंत्री असलेल्या सोमनाथ भारती यांच्याविरोधात त्याची पत्नी लिपिका मित्रा हिने द्वारका उत्तर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
आपल्यावर अटक वॉरंट होते तरीही कायदेशीर सर्व पद्धतींचा अवलंब करूनही सर्वोच्च न्यायालयाने शरण जाण्याचा आदेश दिल्याने आपण पोलिसांना शरण गेलो, असे भारती यांनी सांगितले. सोमनाथ भारती यांचे वडील आजारी असून त्यामुळे काल सायंकाळी ते शरण आले नाहीत, असे त्यांच्या वकिलाने सांगितले. ‘आप’चे मालवीयनगरचे आमदार असलेल्या भारती यांना ताबडतोब शरणागती पत्करण्यास सांगितले होते कारण ते शरण गेले नसते, तर पक्ष अडचणीत आला असता. त्यांनी योग्य त्या न्यायकक्षेतील पोलिसांना शरण जावे यापेक्षा आपण वेगळा आदेश देऊ शकत नाही, असे सरन्यायाधीश एच.एल.दत्तू व न्या. अमिताव रॉय यांनी सांगितले.