नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) बुरारीचे आमदार संजीव झा यांच्यापाठोपाठ आता याच पक्षाचे आमदार अजय दत्त यांनाही त्यांच्या फोनवर खंडणीसाठी ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आपने केली आहे.

आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांनी या दोन आमदारांसह घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, दिल्लीतील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी गृहमंत्री अमित शहा यांनी हस्तक्षेप करावा, अशी आमची मागणी आहे. झा आणि दत्त यांना धमक्या देणारी व्यक्ती एकच आहे, असा दावाही त्यांनी केला. झा यांना २० जून रोजी फोनवरून धमकी मिळाल्यानंतर त्यांनी २१ जून रोजी पोलिसांत तक्रार दिली. हे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडे सोपविण्यात आले आहे. त्यानंतरही झा यांना आतापर्यंत २४ वेळा खंडणीसाठी धमकावण्यात आले आहे. आता दत्त यांनाही अशाच धमक्या दिल्या जात आहेत, असे सिंह म्हणाले.