Enforcement Directorate (ED) conducts raids on AAP MP Ashok Mittal and LPU University in FEMA violation case : ईडीने पंजाबमधील फगवाडा येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (LPU) च्या कॅम्पसवर छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. विशेष बाब म्हणजे, लव्हली ग्रुपचे मालक आम आदमी पार्टीचे खासदार अशोक कुमार मित्तल आहेत. काही दिवसांपूर्वीच मित्तल यांची राघव चड्ढा यांच्या जागी पक्षाचे राज्यसभा उपनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशोक कुमार मित्तल हे या युनिव्हर्सिटीचे संस्थापक आणि संचालक आहेत, तर त्यांचे बंधू रमेश मित्तल आणि नरेश मित्तल यांच्यासह त्यांच्याकडे या युनिव्हर्सिटीची मालकी आहे.
ईडीच्या जालंधर आणि चंदीगड येथील पथकांनी लव्हली ग्रुपशी संबंधित व्यावसायांविरोधात ही छापेमारी केली आहे. यामध्ये लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (LPU) बरोबरच, गुडगावमधील Tetr कॉलेज ऑफ बिझनेस आणि मास्टर्स युनियन कॉलेज ऑफ बिझनेस या संस्थांमध्ये देखील शोध घेण्यात आला.
“आपचे खासदार अशोक मित्तल यांच्या निवासी ठिकाणांवरही शोध घेतला जात आहे,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच त्यांनी ज्या सर्व ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत, ते सर्व लव्हली ग्रुपशी संबंधित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान ईडीकडून केली जात असलेली ही कारवाईपरकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (FEMA) कथित उल्लंघनाच्या चौकशीशी संबंधित असून, बुधवारी पहाटेच हे छापे टाकण्यात आले. “केंद्रीय एजन्सीने स्थानिक पोलिसांकडून कोणतीही मदत मागितलेली नाही,” अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. हिंदुस्तान टाइम्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
फक्त लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी कॅम्पसवर छापे टाकण्यात आलेले नाहीत, तर ग्रुमच्या मालकीची मिठाईची दुकाने, लव्हली ऑटोज आणि एक डिस्टन्स एज्युकेशन सेंटर यांच्यासह अशोक मित्तल यांच्यासह ग्रुपच्या मालकांच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षाने राघव चड्ढा यांच्या जागी अशोक मित्तल यांची राज्यसभेच्या उपनेतेपदी निवड करत त्यांना महत्त्वाचे पद दिले आहे. यानंतर त्यांच्याशी संबंधित मालमत्तांवर ईडीने छापे टाकले आहेत.
मित्तल हे गुरु नानक देव विद्यापीठातून लॉची पदवी घेतलेली आहे आणि ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील सात सदस्यांपैकी ते एक आहेत.
