scorecardresearch

आई ज्या शाळेत स्वच्छता कर्मचारी तिथेच मुलाची प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थिती; ‘आप’च्या आमदाराची प्रेरणादायी कथा

मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात काम करणाऱ्या उगोके यांनी भदौर मतदारसंघातून चन्नी यांचा ३७,५५० मतांनी पराभव केला होता.

पंजाबचे आमदार लाभ सिंग उगोके यांनी मंगळवारी त्यांची आई स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या शाळेत एका कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले.भदौर विधानसभा मतदारसंघात पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा पराभव करणारे उगोके हे उगोके येथील शाळेत प्रमुख पाहुणे होते.


“ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, माझा मुलगा आमदार झाला याचा मला खूप आनंद आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांची आई बलदेव कौर, ज्या गेली २५ वर्षे शाळेत कार्यरत आहेत, त्यांनी एएनआयशी बोलताना दिली आहे. लाभ सिंग उगोके हेही याच शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.


“आम्ही नेहमीच पैसे कमावण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. माझ्या मुलाचे स्थान काहीही असो, मी शाळेत माझे कर्तव्य बजावत राहीन,” असं बलदेव कौर आपल्या मुलाच्या विजयानंतर म्हणाल्या होत्या.


मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात काम करणाऱ्या उगोके यांनी भदौर मतदारसंघातून चन्नी यांचा ३७,५५० मतांनी पराभव केला होता. ते २०१३ मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षामध्ये सामील झाले होते. नुकत्याच पार पडलेल्या पंजाब निवडणुकीत आम आदमी पक्षाने ११७ सदस्यीय विधानसभेत ९२ विधानसभा जागांवर विजय मिळवला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aap punjab mla visits school as chief guest where his mother works as sanitation worker vsk