पीटीआय, नवी दिल्ली

राज्यसभेतील ‘आप’च्या उपनेतेपदावरून हटवल्याच्या दुसर्‍याच दिवशी खासदार राघव चढ्ढा यांनी आपण ‘गप्प केले, पराभूत नाही,’ असे वक्तव्य केले. यावरून संतप्त झालेल्या पक्षाने संसदेत केंद्राविरुद्धचे मुद्दे मांडण्यापासून चढ्ढा पळ काढत असल्याचा आणि त्याऐवजी ‘मवाळ जनसंपर्कात’ मग्न असल्याचा आरोप त्यांच्यावर केला.

पक्षाने संसदेत बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, असा आरोप चढ्ढा यांनी ‘एक्स’वरील संदेशात शुक्रवारी केला. ज्यांनी संसदेत बोलण्याचा माझा अधिकार हिरावून घेतला, त्यांना मला हे सांगायचे आहे की, माझे मौन हा माझा पराभव समजू नका. मी अशी एक नदी आहे, जी योग्य वेळ आल्यावर महापुरात रूपांतरित होऊ शकते. जय हिंद’, असे चढ्ढा म्हणाले. चढ्ढा यांना सभागृहात बोलण्यापासून रोखणे चुकीचे आहे, असे भाजपने म्हटले.

जेव्हाही संधी मिळाली, तेव्हा संसदेत जनसामान्यांशी संबंधित मुद्दे मांडले. ज्यामध्ये अनेकदा दुर्लक्षित केल्या जाणार्‍या विषयांचाही समावेश होता. लोकांच्या समस्यांबद्दल बोलणे हा काही गुन्हा आहे का? मी काही गुन्हा केला आहे का? – राघव चढ्ढा, खासदार, आप

संसदेतील अनेक मुद्द्यांवर चढ्ढा हे पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी सुसंगत नव्हते. महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी केलेल्या सभात्यागातही ते सहभागी झाले नाहीत. – सौरभ भारद्वाज, दिल्ली प्रदेशाध्यक्ष, आप