AAP Rajya Sabha Split 2026 : आम आदमी पक्षात आज मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राज्यसभचे खासदार राघव चड्ढा यांच्यासह आम आदमी पक्षाच्या ७ खासदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी खासदार राघव चड्ढा, खासदार संदीप पाठक आणि खासदार अशोक मित्तल यांनी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. राघव चड्ढा यांनी आज दुपारी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आम आदमी पक्षाचे दोन तृतीयांश खासदार भाजपात विलीन होणार असल्याची माहिती सांगितली होती. या घडामोडींमुळे अरविंद केजरीवाल यांना हा मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, दिल्लीत आज घडलेल्या या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाने हे ‘ऑपरेशन लोटस’ कसं राबवलं? भाजपाने केजरीवालांना कसा धक्का दिला? आम आदमी पक्षाचे भाजपाच्या गळाला लागलेले ते सात खासदार नेमकं कोण आहेत? याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.

‘आप’च्या तीन खासदारांचा भाजपात प्रवेश

आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा, खासदार संदीप पाठक आणि खासदार अशोक मित्तल यांनी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत दिल्लीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

राज्यसभेतील ‘आप’चं संख्याबळ ३ वर

आम आदमी पक्षाचे राज्यसभेत एकूण १० खासदार होते. मात्र, यातील ७ खासदार हे भाजपाच्या गळाला लागले असून या ७ पैकी ३ खासदारांनी आजच भाजपात प्रवेश देखील केला. त्यामुळे आता राज्यसभेत आम आदमी पक्षाचं संख्याबळ १० वरून फक्त 3 वर आलं आहे. या तीनमध्ये संजय सिंह, संत बलबीर सिंग सीचेवाल आणि एन.डी.गुप्ता यांचा समावेश आहे.

भाजपाच्या गळाला लागलेले सात खासदार कोण?

राघव चड्ढा, अशोक मित्तल, संदीप पाठक, हरभजन सिंग, विक्रम सहानी, स्वाती मालीवाल आणि राजेंद्र गुप्ता यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. यातील राघव चड्ढा, अशोक मित्तल, संदीप पाठक यांनी आज भाजपात प्रवेश देखील केला आहे.

राघव चड्ढा कोण आहेत?

‘आप’च्या स्थापनेपासून पक्षात असलेले राघव चड्ढा यांना अरविंद केजरीवाल यांचे अतिशय जवळचे सहकारी म्हणून ओळखलं जात होतं. मात्र, आता पंजाब विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या असतानाच राघव चड्ढा यांच्यासह काही खासदारांनी भाजपात प्रवेश केल्याने आम आदमी पक्षाला धक्का बसला.

अशोक मित्तल कोण आहेत?

आम आदमी पक्षाने काही दिवसांपूर्वीच खासदार अशोक मित्तल यांची राज्यसभेच्या सभागृह उपनेतेपदी निवड केली होती. अशोक मित्तल हे आपचे राज्यसभेचे खासदार आहेत. तसेच ते पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे (LPU) संस्थापक आहेत. अशोक मित्तल हे २०२२ पासून सक्रिय राजकारणात आहेत.

स्वाती मालीवाल कोण आहेत? : एकेकाळी अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीय म्हणून स्वाती मालीवाल यांना ओळखलं जात होतं. मात्र, २०२४ मध्ये त्यांचे अरविंद केजरीवाल यांच्याशी मतभेद झाले होते आणि त्यानंतर स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. तसेच दिल्ली महिला आयोगाच्या मालीवाल माजी अध्यक्षा आहेत.

संदीप पाठक : २०२२ मध्ये पंजाबमधून संदीप पाठक हे राज्यसभेत दाखल झाले होते. संदीप पाठक यांनी केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतलेलं आहे. संदीप पाठक यांनी २०२० च्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आणि २०२२ च्या पंजाब निवडणुकांच्या दरम्यान ‘आप’च्या महत्वाच्या रणनीतीत त्यांची महत्त्वाची भूमिका होती असं बोललं जातं.

हरभजन सिंग : हरभजन सिंग हे क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर ‘आप’मध्ये सामील झाले होते. त्यानंतर २०२२ मध्ये ते राज्यसभेवर आले. दरम्यान, हरभजन सिंग यांनी आम आदमी पक्षाला विशेषतः पंजाबमध्ये सेलिब्रिटी म्हणून लोकप्रियता ओळख मिळवून दिली.

विक्रम साहनी : राज्यसभा खासदार विक्रम साहनी हे सन ग्रुपचे प्रमुख आहेत. तसेच त्यांना सामाजिक कार्यांसाठी ओळखलं जातं. पद्मश्री पुरस्कार विजेते विक्रम साहनी हे एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत. पंजाब विधानसभेच्या निवडणुका एक वर्षावर आल्या असतानाच विक्रम साहनी यांनी देखील आपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे ‘आप’चं गणित बिघडण्याची शक्यता आहे.

राजिंदर गुप्ता : पंजाबमधील राज्यसभा खासदार असलेले राजिंदर गुप्ता हे ट्रायडंट ग्रुपचे प्रमुख आहेत. वस्त्रोद्योग, कागद आणि रसायन या क्षेत्रांमध्ये हा ग्रुप कार्यरत आहे.

भाजपाने ‘ऑपरेशन लोटस’ राबवत केजरीवालांना कसा धक्का दिला?

गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षात घडामोडी सुरू होत्या. काही दिवसांपूर्वीच राज्यसभचे खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेते पदावरून आम आदमी पक्षाने हटवलं होतं. त्यामुळे खासदार राघव चड्ढा हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. मात्र, आज खासदार राघव चड्ढा यांच्यासह काही खासदारांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजपाने ‘ऑपरेशन लोटस’ नेमकं कसं राबवलं? याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.