अॅडमिरल एल. रामदास यांना पक्षाच्या अंतर्गत लोकपाल पदावरून, तसेच प्रशांत भूषण यांना शिस्तभंग समितीच्या प्रमुखपदावरून हटवण्याच्या निर्णयाविरुद्ध आवाज उठवणारे आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य राकेश सिन्हा यांना पक्षाने गुरुवारी निलंबित केले.
रामदास व भूषण यांना महत्त्वाच्या पदांवरून हटवण्याचा निर्णय घाईघाईने आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांशी योग्य प्रकारे सल्लामसलत न करता घेण्यात आल्याचा आरोप सिन्हा यांनी पक्षनेतृत्वावर केला होता. त्याचप्रमाणे, योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्याबाबतचे प्रकरण निकषानुसार पक्षाच्या अंतर्गत लोकपालाकडे न सोपवता त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणारे पत्र त्यांनी पक्षाचे सचिव पंकज गुप्ता यांना पाठवले होते. सिन्हा यांच्यासह उत्तर प्रदेशातील दुसरे सदस्य विशाल लाठे यांना चौकशी सुरू असतानाच निलंबित करण्यात आल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना २८ मार्च रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीतून हटवण्यात आल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे दोघे हजर होते, असे पक्षाच्या एका प्रवक्त्याने सांगितले.