कॉंग्रेस पक्षाने दिलेल्या पाठिंब्याच्या आधारावर दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करायची का, यावर आम आदमी पक्ष येत्या सोमवारी निर्णय जाहीर करेल, असे पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
आम आदमी हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष असल्याने कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करायची का, याबद्दल दिल्लीतील जनतेला काय वाटते, हे आम्ही बुधवारपासून रविवारपर्यंत जाणून घेऊ. त्यानंतरच सोमवारी सत्ता स्थापन करण्याबद्दल निर्णय घेऊ, असे केजरीवाल म्हणाले. पक्षाने यासाठी २५ लाख नागरिकांना पत्र लिहिले असून, सत्ता स्थापनेबाबत त्यांचे मत काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जर सर्वाधिक नागरिकांनी सत्ता स्थापन करण्याबद्दल सहमती दर्शवली, तरच सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल, असेही ते म्हणाले.
आम आदमी पक्षाने भाजपला पाठविलेल्या पत्राचे साधे उत्तरही देण्यात आलेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेसाठी आमच्या पक्षाने उपस्थित केलेल्या १८ मुद्द्यांच्या आधारावर भाजप आणि कॉंग्रेसला पत्र पाठविण्यात आले होते. मात्र, भाजपने या पत्राला साधे उत्तरही दिले नाही. जर भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांना या पत्राला स्वतः उत्तर देणे उचित वाटले नसेल, तर त्यांनी इतर कोणाला तरी उत्तर द्यायला सांगायला हवे होते, असाही टोला केजरीवाल यांनी लगावला.

Story img Loader