पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाचे (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकावर कलम 370 रद्द करण्यावरुन टीका केली आहे. मागील दोन महिन्यांपासून श्रीनगर येथे स्थानबद्ध असलेल्या मुफ्ती यांनी सरकारवर ट्विटवरुन आरे येथील वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर टीका केली आहे. मुंबईमधील आरे कॉलीनीमधील झाडांचा विषय हा काश्मीरमधील लोकांच्या आयुष्यापेक्षा अधिक महत्वाचा आहे असा टोला मुफ्ती यांनी लगावला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आरेमधील वृक्षतोड तात्पुरती थांबवण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुफ्ती यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करण्यात आले आहे. मुफ्ती या नजरकैदेत असल्याचे त्यांची मुलगी इल्तिजा हे ट्विटर हॅण्डल बघत आहे. पहिल्या ट्विटमध्ये आरेतील झाडे ही काश्मीरमधील लोकांच्या आयुष्यापेक्षा अधिक महत्वाचे असल्याचे म्हटले आहे.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये मुफ्ती यांनी आरेमधील झाडे पाडण्यापासून पर्यावरणप्रेमींना यश आल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ‘व्यक्ती स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य यासारखे मूलभूत अधिकारही काश्मीरी लोकांना का नाकारले जात आहेत हे समजत नाहीय. सध्या काश्मीरींना इतर भारतीयांप्रमाणे हक्क दिले जात असल्याचे भारत सरकार सांगत आहे पण सत्य परिस्थिती वेगळी आहे. येथील काश्मीरी लोकांचे मूलभूत अधिकारही काढून घेण्यात आले आहेत,’ अशी टीका मुफ्ती यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आली आहे.

मुफ्ती या नजरकैदेत असल्याने त्यांचे ट्विटर हॅण्डल त्यांची मुलगी इल्तिजा हाताळत आहे. यासंदर्भात आपण ट्विटरकडून परवानगी घेतली असल्याचे इल्तिजा यांनी म्हटले आहे. सोमवारी पीडीपीच्या एक प्रतिनिधी मंडळाने मुफ्ती यांची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाने २१ ऑक्टोबरपर्यंत आरेमधील एकही झाड कापू नये असे आदेश राज्य सरकारला दिल्यानंतर मुफ्ती यांनी हे ट्विट केले आहे.