स्मृतीस्थळ न झाल्याने कलाम यांच्या नातेवाईकाची भाजपला सोडचिठ्ठी

कलाम यांच्या निवासस्थानाचे स्मृतीस्थळात रुपांतर करण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याने निर्णय

माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम.

भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या दिल्लीतील निवासस्थानाचे स्मृतीस्थळात रुपांतर करण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचे कारण देत कलाम यांच्या पणतूने भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यावर डॉ. कलाम हे दिल्लीतील प्रसिद्ध ल्युटन्स झोनमधील १०, राजाजी मार्ग येथील निवासस्थानी राहात होते. या निवासस्थानाचे कलाम यांच्या स्मृतीस्थळात रुपांतर करण्याची मागणी अनेकांनी केली होती. त्यासाठी कलाम यांचे पणतू ए.पी.जे सय्यद हजा इब्राहिम हे देखील आग्रही होते. पण, कलाम यांच्या निधनानंतर त्यांचे निवासस्थान केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांना देण्याचा निर्णय नगरविकास मंत्रालयाने घेतला. केंद्राच्या या निर्णयावर सय्यद हजा इब्राहिम हे नाराज होते. अखेर त्यांनी सोमवारी आपली नाराजी जाहिररित्या व्यक्त करत पक्षातील पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहिर केले.

कलाम यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांचे स्मृतीस्थळ व्हावे अशी केवळ माझीच नव्हे तर संपूर्ण देशाची इच्छा होती. अनेकदा विनंती करूनही या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आल्याने पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे सय्यद हजा इब्राहिम यांनी सांगितले. २०१२ साली भाजपमध्ये दाखल झालेले ए.पी.जे सय्यद हजा इब्राहिम हे तमिळनाडूत भाजपच्या अल्पसंख्याक शाखेच्या उपाध्यक्षपदी कार्यरत होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Abdul kalams grand nephew quits bjp over bungalow row