scorecardresearch

ईश्वरप्पा यांच्याविरोधात गुन्हा ; कर्नाटकमध्ये कंत्राटदाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

प्रशांतने त्याच्या तक्रारीत मंत्री ईश्वरप्पा, तसेच त्यांचे कर्मचारी रमेश व बसवराज यांची नावे आरोपी म्हणून घेतली आहेत.

ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

मंगळुरू :कर्नाटकातील उडुपी येथे एका बांधकाम कंत्राटदाराला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री के.एस. ईश्वरप्पा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात ईश्वरप्पा यांना प्रथम क्रमांकाचे आरोपी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणात नेमके काय घडले आहे हे जाणून गेण्यासाठी आपण स्वत: ईश्वरप्पा यांच्याशी बोलू, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

यापूर्वी ईश्वरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावणारा मृत कंत्राटदार संतोष पाटील याचा भाऊ प्रशांत पाटील याच्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. संतोष पाटील हा मंगळवारी उडुपीतील एका लॉजमध्ये मृतावस्थेत सापडला होता. त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे. प्रशांतने त्याच्या तक्रारीत मंत्री ईश्वरप्पा, तसेच त्यांचे कर्मचारी रमेश व बसवराज यांची नावे आरोपी म्हणून घेतली आहेत.

प्रशांतने केलेल्या तक्रारीनुसार, २०२०-२१ साली हिंदूलगा खेडय़ातील लोकांनी ईश्वरप्पा यांची भेट घेऊन त्यांना गावात रस्ते बांधण्यासह इतर कामे करण्याची विनंती केली होती. ईश्वरप्पा यांनी त्यांना बजेटची काळजी न करता काम सुरू करण्यास सांगितले. यानंतर संतोष पाटीलला या कामांचे कंत्राट देण्यात आले. संतोषने गावात ४ कोटींची कामे केली. त्याने स्वत:चा पैसा या प्रकल्पात लावला आणि या कामाचे बिल थकीत होते.

संतोषने अनेकदा मंत्री ईश्वरप्पा यांची भेट घेऊन त्यांना ही रक्कम जारी करण्याची विनंती केली होती. पण त्यांचे जवळचे सहकारी बसवराज व रमेश हे ४० टक्के कमिशनची मागणी करत होते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एका न्यायसहाय्यक पथकाने पाटील मृतावस्थेत आढळलेल्या ठिकाणाला भेट देऊन पुराव्यांची पाहणी केली.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला अटक होईपर्यंत आपण संतोषचे पार्थिव स्वीकारणार नाही, अशी भूमिका त्याच्या कुटुंबीयांनी घेतली आहे. उडुपी पोलिसांनी बुधवारी मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली.

राजकीय वाद

पाटील याच्या मृत्यूमुळे मंगळवारी राजकीय वाद उफाळून, काँग्रेसने ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तथापि, ईश्वरप्पा यांनी राजीनामा देण्याची शक्यता फेटाळून लावली. व्हॉट्सअ‍ॅपवरील एक संदेश ‘मृत्यूबाबतची चिठ्ठी’ (डेथ नोट)कशी काय ठरू शकते, असा प्रश्न त्यांनी विचारला. संतोष पाटील याच्या मृत्यूमागील ‘कारस्थानाचा’ तपास करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मी ईश्वरप्पा यांच्याशी बोलून माहिती घेईन. चौकशी पूर्ण झाली की सत्य बाहेर येईल. या प्रकरणात कुठलाही हस्तक्षेप केला जाणार नाही आणि कायद्यानुसार चौकशी होईल. आमच्या राष्ट्रीय नेत्यांना या संपूर्ण प्रकरणाची कल्पना असून, मीही त्यांना याबाबत माहिती दिली आहे.

बसवराज बोम्मई, मुख्यमंत्री कर्नाटक

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Abetment of suicide case registered against karnataka minister ks eshwarappa zws