जून आणि जुलै महिन्यात दिल्लीतल्या जंतर-मंतरवर तरुणाई एकवटली होती. CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टीने या आंदोलनाचं नेतृत्त्व केलं होतं. नीट परीक्षेतील घोळ, पेपरफुटी या विरोधात हे आंदोलन होतं. ज्यातील प्रमुख मागणी होती ती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. मात्र या दरम्यान जेन झीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचंड शिव्या देण्यात आल्या, देशाच्या पंतप्रधान पदी बसलेल्या नरेंद्र मोदींबाबत शिवराळ भाषा वापरण्यात आली. याबाबत CJP चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी भूमिका मांडली आहे. शिवीगाळ करण्याचं समर्थन मी करणार नाही पण मोदींसह, भाजपा नेत्यांची वक्तव्य काय होती ते आठवा असं अभिजीत दिपकेंनी म्हटलंय.
काय म्हटलंय अभिजीत दिपकेंनी?
“मला वाटतं की भाषा हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे. त्यामुळे कुणालाही शारिरीक इजा होत नाही. पण हे म्हणत असलो तरीही मी शिवीगाळ केल्याचं समर्थन मुळीच करत नाही. आम्ही एक महिना जे आंदोलन केलं होतं त्यात आम्ही कुठेही असे चुकीचे शब्द वापरले नाहीत. पण शिवी देणं हा गुन्हा आहे का? अपराध आहे का? नाही. ते तात्विकदृष्ट्या योग्य आहे की अयोग्य आहे हा पुन्हा एकदा वादाचा विषय आहे. पण तो क्राईम नाही की त्याचा गुन्हा नोंदवला जावा. जर तुम्हाला शिवीगाळ करणं हा गुन्हा ठरवायचा असेल तर देशातल्या प्रत्येक माणसावर FIR लागेल. कारण आपल्या देशातला मला असा माणूस दाखवा ज्याने शिवी दिलेली नाही. माझे आजोबाही सकाळी उठल्या उठल्या शिव्या द्यायचे.” असं अभिजीत दिपकेंनी म्हटलं आहे. साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत दिपकेंनी हे विधान केलं आहे.
मोदीजी म्हणाले होते पचास करोड की गर्लफ्रेंड त्याचं काय?
अभिजीत दिपके पुढे म्हणाले की, “खासदारांनी संसदेत भाषा काय वापरली होती आठवा. योगी आदित्यनाथ यांनी ANI च्या कॅमेरा पर्सनला शिवी दिली होती. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी पचास करोड की गर्लफ्रेंड. मग जर नियम आणि कायदे आहेत ते फक्त तरुणांवरच लागू करण्यासाठी आहेत आणि नेत्यांवर लागू करण्यासाठी नाहीत का? शिवीगाळ करण्याचं मी समर्थन करु शकत नाही. पण शिवीगाळ करणं हा गुन्हा नाही. लहान लेकरं आहेत २०-२५ वर्षांची. त्यांना समजावून सांगा. मी चुकायचो तिथे आई वडील मला समजवत होते. आता तुम्ही गुन्हे दाखल करुन मुलांना त्रास देत आहात. २५ वर्षांच्या एका मुलीने चुकीचा शब्द वापरला मी नाकारत नाही. पण गुन्हा दाखल करुन तुम्ही तिचं करिअर संपवत आहात. तिला समजावून सांगा, पण तसं न होता सगळी यंत्रणा तिच्या मागे लावून काय होणार आहे का?” असा प्रश्न दिपकेंनी विचारला. पुढे अभिजीत दिपके म्हणाले, भाजपाच्या आयटी सेलचे लोक इतक्या वर्षांपासून महिलांना घाण शिव्या देतात. बायोमध्ये लिहितात फॉलोड बाय मोदी. एकावरही FIR झालेली नाही.
