दिल्लीमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने जे आंदोलन पुकारलं आहे त्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. मुंबईहून दिल्लीत आलेल्या अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका या तिघांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी विमानातूनच ताब्यात घेतलं. आता या तिघांना प्रतिबंधात्मक ताब्यात ठेवलं जाणार आहे आणि दिल्ली कॅन्ट पोलीस ठाण्यात कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं गेलं होतं. या तिघांची न्यायालयाने सशर्त सुटका केली आहे. या सुटकेनंतर अभिजीत दिपकेंनी एक्स पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

अभिजीत दिपकेंची पहिली पोस्ट काय?

“पंतप्रधान म्हणून मोदी हे भारतासाठी एक लज्जास्पद व्यक्ती आहेत. या देशाने यापूर्वी कधीही इतका मोठा भ्याड आणि जुलमी माणूस पाहिला नाही.” अशी पोस्ट अभिजीत दिपके यानी केली आहे. दरम्यान आज अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका या तिघांची सशर्त सुटका करण्यात आली आहे. एक वर्षभर कुठल्याही शांततेचा भंग होणार नाही या अटीवर हा जामीन देण्यात आला आहे. यानंतर आता अभिजीत दिपकेंनी ही पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भ्याड आणि जुलमी असं म्हटलं आहे.

दिपके, दास आणि रांका २३ तास पोलिसांच्या ताब्यात

अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका २३ तासांपासून हे तिन्ही नेते दिल्ली पोलिसांच्या ताब्यात होते. या घटनेमुळे दिल्लीतील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या सुटकेने सीजेपी कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. या अटकेमुळे पुढील आंदोलनाची जबाबदारी अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली होती, मिळालेल्या माहितीनुसार सुटकेवेळी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. अभिजीत दीपके यांच्या आजीचे निधन झाल्यामुळे त्यांना महराष्ट्रात येण्याची परवानगी असू शकते, अशा चर्चा आहेत. मात्र आता नेत्यांच्या सुटकेमुळे सीजेपीची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.