Abhijeet Dipke Delhi Police row: दिल्ली पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भगतसिंग यांच्यावरील पुस्तकांचा अवमान केल्याचा आरोप, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला आहे. जंतर मंतर येथे सध्या सुरु असणाऱ्या आंदोलनावेळी पुस्तकांच्या स्टॉलवरील पुस्तके दिल्ली पोलिसांनी फेकून दिल्याचा आरोप दिपकेंनी केला. दिपकेंनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत पोस्ट करुन सहाय्यक पोलीस आयुक्त अजय शर्मा आणि त्यांच्या टीमवर कारवाई करण्याची मागणी केली.
एसीपी अजय शर्मा यांच्यावर आरोप
“सहाय्यक पोलीस आयुक्त अजय शर्मा आणि त्यांच्या टीमने पुस्तकं फेकून दिली. या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि भगतसिंग यांच्या पुस्तकांचा समावेश होता. पोलिसांनी पुस्तकांचा स्टॉल उभारला म्हणून विद्यार्थ्यांना मारहाण देखील केली”, असा आरोप अभिजीत दिपके यांनी एक्स पोस्टमधून केला. “छत्रपती शिवाजी महाराज आणि भगत सिंग यांचा अवमान केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त अजय शर्मा यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे अशी आम्ही मागणी करतो”, असे दिपकेंनी पुढे पोस्टमध्ये म्हटले आहे.
एक्स पोस्टमध्ये काय म्हणाले दिपके?
अभिजीत दिपकेंनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक आणि विद्यार्थ्यांना मारहाणीचे व्रण दिसणारे फोटो शेअर केले आहेत. नीट पेपरफुटीप्रकरणी गेल्या १३ दिवसांपासून अभिजीत दिपके आंदोलन करत आहेत. जंतर मंतर येथे सुरु असणाऱ्या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सहभागी झाले असून, त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. दिपकेंनी सोनम यांच्या तब्येतीची माहिती देखील एक्सवरुन शेअर केली आहे. अन्नत्याग आंदोलन करत असणाऱ्या सोनम यांची तब्येत सलग पाचव्या दिवशीही खराब होत असल्याचे दिपकेंनी म्हटले आहे.
सोनम वांगचुक यांचे अन्नत्याग आंदोलन
दिपकेंनी दिलेल्या माहितीनुसार, “सोनम वांगचुक यांची तब्येत ढासळत असून, त्यांची साखर कमी (६०) झाली आहे शिवाय त्यांचा रक्तदाब देखील कमी झाला आहे. सोनम सरांना काही झाल्यास सरकार जबाबदार असेल.” दिपके आणि वांगचुक यांच्या आंदोलनाला विरोधी पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून देखील समर्थन मिळत आहे.
दिपकेंनी देखील “चाय पे चर्चा विथ कॉक्रोचेस” अशी चळवळ सुरु केली असून, आंदोलन अधिक चांगले आणि मोठे करण्यासाठी सूचना मागवल्या आहेत. २० जूनपासून दिपकेंनी नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन सुरु केले आहे.
