Abhijeet Dipke Gyanesh Kumar BJP Allegations: “भाजपा सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर नाही तर ज्ञानेश कुमार यांच्या करामतीमुळे निवडणूक जिंकत आहे. भाजपाचा रिअल हिरो ज्ञानेश कुमार आहेत. भाजपासाठी त्यांची एवढी तळमळ पाहता त्यांना पक्षाचा अधिकृत प्रवक्ता म्हणूनच घोषित करायला हवे”, अशी घणाघाती टीका कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. त्यांनी ज्ञानेश कुमार यांचा पुढच्या ४८ तासांत राजीनामा मागितला असून तसे न झाल्यास देशव्यापी आंदोलन छेडण्याची घोषणा केली.
ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त झाल्यानंतर भाजपाची अनेक राज्यात मतदानाची टक्केवारी वाढली, हे आकडेवारीसह अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. “पंतप्रधान मोदी यांची प्रसिद्धी शिखरावर असतानाही भाजपा काही राज्यात जिंकू शकत नव्हती. २०१४ ते २०१९ पर्यंत पंतप्रधान मोदी जिथे जिथे जात होते, तिथे जिंकत होते. तेव्हा कुणीही प्रश्न उपस्थित केले नाहीत. कारण तेव्हा त्यांची लाट होती. आज देशात भाजपा आणि मोदींच्या विरोधात नाराजी असूनही ते कसे काय जिंकू शकतात?”, असा सवाल अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला.
भाजपाला जिंकून देण्यात ज्ञानेश कुमार यांचा वाटा
“भाजपा पूर्वी ज्या राज्यात जिंकू शकत नव्हती, तिथेही त्यांना यश मिळण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ज्ञानेश कुमार, असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम करण्याचा ज्ञानेश कुमार यांना कोणताही अधिकार नाही. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा”, अशी मागणी अभिजीत दिपके यांनी केली.
अभिजीत दिपकेंचे आरोप काय?
भाजपा सत्तेत कशी राहील, याची पूर्ण खबरदारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार घेत होते, असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला. ते म्हणाले, “ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त होण्याआधी हरियाणात भाजपाची मतांची टक्केवारी ३६ टक्के होती, ती ज्ञानेश कुमार आल्यानंतर ४० टक्क्यांवर पोहोचली. चार टक्क्यांची वाढ झाली. महाराष्ट्रात भाजपाची टक्केवारी २५ टक्के होती, ती नंतर वाढून २७ टक्के झाली.”
“दिल्लीमध्ये भाजपाची मतांची टक्केवारी ३८ टक्के होती, ज्ञानेश कुमार आल्यानंतर ती ४५ टक्क्यांवर पोहोचली. पश्चिम बंगालमध्ये ज्ञानेश कुमार येण्यापूर्वी भाजपाच्या मतांची टक्केवारी ३७ टक्के होती, ती नंतर ४६ टक्के इतकी झाली. आसाममध्ये आधी ३३ टक्के आणि नंतर ३७ टक्के इतकी टक्केवारी वाढली. यामुळे भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर नाही तर ज्ञानेश कुमार यांच्यामुळे जिंकत आहे”, असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला.
