आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये रविवारी सकाळी ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP)सह-संयोजक आशुतोष रांका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आसाम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ट्विट करत पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र प्रश्न उपस्थित केले असून, टीमला अज्ञात स्थळी नेण्यात आल्याचा दावा केला आहे.
शांततापूर्ण मेळाव्यापूर्वीच पोलिसांची नाकेबंदी
रविवारी २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता गुवाहाटीतील चौधरी टिळा भागात ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या स्वयंसेवकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, मेळावा सुरू होण्यापूर्वीच आसाम पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि रस्ते बंद केले. कार्यकर्ते एकत्र येण्याआधीच पोलिसांनी आशुतोष रांका यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. असा दावा आशुतोष रांका यांनी केला आहे.
“मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा घाबरले आहेत” — आशुतोष रांकांचा घणाघात
अटक होण्यापूर्वी आशुतोष रांका यांनी राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर थेट हल्लाबोल केला.
“आसाममधील सरकारी शाळांची खरी परिस्थिती देशासमोर येईल, या भीतीने मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा घाबरले आहेत. काझीरंगा परिसरातील स्थानिक लोकांचे हक्क कसे हिरावले जात आहेत आणि तेथील जमीन, जंगल आणि पाणी बड्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात कसे घातले जात आहे, हे सत्य बाहेर येऊ नये म्हणूनच ही चिरडशाही सुरू आहे.”
— आशुतोष रांका, सह-संयोजक (CJP)
सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया आणि मीम्सची लाट
पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी X (ट्विटर) वर पोस्ट करत लिहिले, “आसाम पोलिसांनी आशुतोष रांका आणि CJP टीमला ताब्यात घेतले असून त्यांना अज्ञात स्थळी नेले जात आहे. आशु आणि त्यांचे सहकारी केवळ एका छोट्या मेळाव्यासाठी आसामला गेले होते.”
या घटनेनंतर सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले आहेत. पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स, पाण्याचे टँकर आणि पोलिस गणवेशातील गोरिल्लाचे व्यंगचित्रात्मक मीम्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
