Abhijeet Dipke attacked Jaipur: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जयपूर, राजस्थानमध्ये आंदोलन सुरु असताना आज (१५ जून) दिपकेंना मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला असून, दिपकेंना खांद्यावर घेतले असताना काही जणांनी त्यांच्यावर हात उचलला असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिपके गेल्या काही दिवसांपासून आवाज उठवत आहेत.
जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना
नीट पेपरफुटीचा मुद्दा घेऊन अभिजीत दिपके केल्या काही दिवसांपासून आवाज उठवत आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिपके आंदोलन करत आहेत. पुण्यातून सुरु झालेले हे आंदोलन सोमवारी (१५ जून) जयपूर राजस्थान मध्ये दाखल झाले. पण, उपस्थितींना मार्गदर्शन करण्यापूर्वी दिपकेंना मारहाण करण्यात आली. याप्रकरणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, दिपकेंना खांद्यावर घेतल्यानंतर काही जणांनी त्यांना मारहाण केल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
मारहाणीचा व्हिडीओ समोर
दिपकेंचा स्कार्फ ओढून त्यांना कानशिलात लगावल्याचे व्हिडीओत दिसत आहे. चारवेळी त्यांना तोंडावर मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. त्यांना समर्थकाच्या खांद्यावरुन खाली ओढण्याचा प्रयत्न देखील झाल्याचा दावा केला जात आहे. यानंतर घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाल्याचेही सांगितले जात आहे.
घटनास्थळी तणावानंतर दिपकेंचे आवाहन
दिपकेंना मारहाण झाल्यानंतर घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला. उपस्थित जमावाने हल्लेखोरांना ताब्यात घेत त्यांना देखील चोप दिल्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. दरम्यान, घटनेनंतर दिपके जमावाला शांत राहण्यास सांगताना दिसत आहेत. तसेच, “ज्यांनी मारहाण केली त्यांना सोडून द्या, त्यांना कोणत्याही प्रकारे मारहाण करु नका”, असे आवाहन उपस्थितांना करतानाचा दिपकेंचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.
दिल्लीतही करणार आंदोलन
नीट पेपरफुटी प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आंदोलन करत आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी दिपकेंनी केली आहे. पुण्यातून सुरु झालेले हे आंदोलन दिल्लीत देखील होणार आहे. दिपकेंच्या या आंदोलनाला सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून देखील पाठिंबा मिळताना दिसत आहे. पुण्यातील आंदोलनाला सोनम वांगचूक यांनी देखील हजेरी लावली होती. दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
