Abhijeet Dipke Balaghat Visit: मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात संसर्गजन्य रोगामुळे ३० हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी बालाघाटचा दौरा करून पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार शनिवारी ते बालाघाट येथे पोहोचले. मात्र यावेळी त्यांना स्थानिक यूट्यूबर्सनी घेराव घालून त्रास दिला. ‘मुलांच्या प्रेतावर आता राजकारण करायला आलास का?’, असे प्रश्न विचारत यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स म्हणवणाऱ्या काही जणांनी अभिजीत दिपकेंच्या गाडीला घेरले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आणि आरोग्य सुविधांविषयी माहिती गोळा करण्यासाठी अभिजीत दिपके यांनी शनिवारी अडोरी, कारेका आणि बोंडारी या गावांना भेट दिली.

अभिजीत दिपके हे बालाघाट परीसरात पोहोचल्यानंतर स्वतःला इन्फ्लूएन्सर आणि यूट्यबर्स म्हणवणाऱ्या काही लोकांनी अभिजीत दिपके गाडीत असताना त्यांना घेरले. “तुम्ही इथे प्रेतांवर राजकारण करायला आला आहात का?, इतक्या उशीरा इथे का आले? तुम्हाला आता जाग आली का?”, असे प्रश्न दिपके यांना विचारले. उशीरा आल्याबद्दल मी माफी मागतो, असे उत्तर यावेळी दिपके यांनी दिले.

यानंतर एका यूट्यूबर महिलेने इथे चांगला रस्ता बांधला आहे, तुम्हाला दिसत नाही का?, असेही सांगितले. परिस्थिती चिघळल्यामुळे दिपके यांच्याबरोबर असलेल्या सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना कथित माध्यमकर्मींपासून दूर नेले. यानंतर हातात माईक घेतलेल्या काही महिला ‘बघा तो पळून जातोय’, अशी टिप्पणी केली.

बालाघाटमध्ये ३० हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने सरकारला जाब विचारला आहे. येथील आदिवासी मुलांना वैद्यकीय उपचार मिळत नसल्याचा आरोप जनहित याचिकेद्वारे करण्यात आला आहे. या याचिकेवर सुनावणी करत असताना उच्च न्यायालयाने राज्याचा आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, बालाघाट जिल्हाधिकारी यांना नोटिसा बजावल्या आहेत. अशावेळी अभिजीत दिपके यांनी या भागाचा दौरा केल्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळले आहे.

जनहीत याचिकेत केलेल्या दाव्यानुसार, याठिकाणी ५० खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयात सुमारे ४०० मुलांवर उपचार सुरू आहेत.

सौरव दास यांची टीका

सीजेपीचे सह-संयोजक सौरव दास यांनी अभिजीत दिपकेंना त्रास दिल्यानंतर सदर प्रकारावर टीका केली. “भाजपाकडून भाड्याचे माध्यमकर्मी पाठवून त्यांचा अजेंडा रेटण्याचे काम केले जात आहे. कोणताही खरा पत्रकार अशाप्रकारचे राजकीय अभिनिवेश असलेले प्रश्न विचारणार नाही. हे इतके उघड आहे की, यावर हसू येत आहे. अशा मूर्ख डावपेचांना आम्ही घाबरू, हा त्यांचा गैरसमज आहे”, अशी टीका सौरव दास यांनी केली.

मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत आहे – दिपके

या सगळ्या प्रकारानंतर अभिजीत दिपके यांनी उपरोधिक शैलीत याला प्रत्युत्तर दिले. अभिजित दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पत्र शेअर करत मी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले.

“मी तात्काळ प्रभावाने मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो. मला मध्य प्रदेशातील जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे; परंतु या संधीचे सोने करण्यात आणि जनतेची सेवा करण्यात मी पूर्णपणे अपयशी ठरलो आहे”, असा उपरोधिक टोला अभिजीत दिपके यांनी या पोस्टमधून लगावला.