“गेल्या १०-१२ वर्षात देशाचे राजकारण फक्त हिंदु-मुस्लिम अजेंड्याभोवती फिरत आहे. परंतु, या मुद्द्यांमुळे तरुणांना नोकर्या मिळणार नाहीत. आता देशातील राजकारणाचा रोख बदलून तो रोजगार आणि शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयांवर येणे गरजेचे आहे,” अशी प्रतिक्रिया ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिली.
दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या यशस्वी आंदोलनानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी NEET पेपर लीक आणि CBSE मधील गोंधळावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. या पत्रकार परिषदेतील ५ प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.
१. रोजगार आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज
दिपके म्हणाले की, देशातील तरुणांसाठी शिक्षण आणि रोजगार हे सर्वात मोठे प्रश्न आहेत. सरकारचे प्राधान्यक्रम बदलण्याची गरज असून, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरही शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी हे आंदोलन सुरूच राहील.
२. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी का?
परीक्षेतील घोटाळ्यांवरून सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले, “खाजगी कंपन्यांमध्ये चुका झाल्यावर कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकले जाते. मग सरकारी परीक्षांचे पेपर वारंवार लीक होऊनही इथे कोणीच जबाबदारी का घेत नाही? जोपर्यंत शिक्षणमंत्री राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत सरकारला आपल्या चुकांची जाणीव झाली आहे, असे आम्ही कशावरून मानायचे?” धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर देशव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही अभिजीत दिपके यांनी दिला आहे.
३. आंदोलकांवरील टीकेला चोख प्रत्युत्तर
जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी झालेल्यांवर होणाऱ्या टीकेला त्यांनी कडक शब्दांत उत्तर दिले. “आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना, प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना आणि माध्यमांना प्रत्येक वेळी ‘पाकिस्तानी’ म्हटले जाणार का? सत्ताधारी पक्षाचे ‘आयटी सेल’ चालवणारेच काय फक्त भारतीय आहेत?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.
४. शेजारील देशांतील हिंसक आंदोलनांशी तुलना अयोग्य
नेपाळ किंवा बांगलादेशमधील सत्तांतराच्या आंदोलनांशी या आंदोलनाची तुलना करणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “भारतात एक लोकशाही व्यवस्था आहे. आमचे जंतरमंतरवरील आंदोलन अत्यंत शांततापूर्ण होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण यात सहभागी झाले होते. आमची पुढील आंदोलनेही अशाच प्रकारे शांततेच्या मार्गाने, पण मोठ्या प्रमाणावर होतील,” असे दिपके यांनी सांगितले.
५. राजकीय पक्षांशी कोणतीही युती नाही
हा लढा राजकीय नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, ‘कॉकरोच जनता पार्टी’ ही पूर्णपणे स्वतंत्र संघटना आहे. हे आंदोलन ‘जेन झी’ (Gen Z) म्हणजेच आजच्या तरुण पिढीसाठी आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने याला बाहेरून पाठिंबा दिला तर त्याचे स्वागत आहे, मात्र आम्ही कोणत्याही पक्षासोबत युती किंवा आघाडी करणार नाही.
