नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना सात दिवसांत हटविले नाही तर देशव्यापी आंदोलन केले जाईल, असा इशारा कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) शनिवारी दिला. आम्ही घाबरणार नाही तसेच आम्हाला कोणी संपवू शकणार नाही, असे आव्हान पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी जंतरमंतर येथील आंदोलनात दिले. तुरुंगवासाच्या भीतीने अनेक जण विकले गेले आहेत. मात्र या देशातील तरुण तसेच विद्यार्थी विकलेला नाही असेही त्यांनी निक्षून सांगितले.

अमेरिकेहून आगमन झाल्यानंतर दिपके यांनी जंतरमंतर येथे आंदोलन केले. विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी यांच्यासह शेकडो तरुण जंतरमंतर येथे उपस्थित होते. ‘‘आमचा संघर्ष दीर्घकाळ चालणार आहे. समाजमाध्यमाद्वारे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आपण मागितला. मात्र सरकार संबंधितांवर करण्याऐवजी आमची समाजमाध्यम खाती बंद करणे किंवा मजकुरावरावर निर्बंध आणणे अशाच उद्योगात गुंतल्याचा आरोप दिपके यांनी केला. समाजमाध्यमावरील आमचा मजकूर वगळाल, पण आम्हाला संपवू शकणार नाही, असे दिपके यांनी स्पष्ट केले.

दिपके यांच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली होती. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे फलक आणि पक्षाचे मुखवटे परिधान करून युवक आंदोलनस्थळी येत होते. नीट, सीबीएसई, सीयूईटी परीक्षा आणि भरती चाचण्यांमधील कथित अनियमिततेबद्दल जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणार्या ‘सीजेपी’ या तरुणांच्या नेतृत्वाखालील ऑनलाइन चळवळीने हे आंदोलन आयोजित केले होते. दिपके यांनी आंदोलकांना देशाचा जयजयकार करण्याच्या घोषणा द्याव्यात, अशी सूचना केली. महात्मा गांधी तसेच बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीय राजकारणाला विरोध केल्याचे नमूद केले.

मायदेशात आल्यावर अटक होईल अशी धास्ती माझ्या आईला होती. ही केवळ माझ्याच नव्हे तर, राजकारणावर भाष्य करणार्या बहुसंख्य युवकांच्या आईची धारणा असल्याचे दिपके यांनी सांगितले. आंदोलनस्थळी कडेकोट सुरक्षा होती. पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक हेदेखील आंदोलनात सहभागी झाले होते. दुपारी साडेतीन वाजता आंदोलन समाप्त झाले.

सहा जण ताब्यात : आंदोलनस्थळी दोन गटांमधील वाद टाळण्यासाठी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केेले.

दिपके यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवला

छत्रपती संभाजीनगर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिपके यांच्या वाळूंज एमआयडीसी परिसरातील निवासस्थानाबाहेर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षाव्यवस्था वाढवली आहे. यापूर्वी संबंधित निवासस्थानावर चार पोलीस कर्मचारी आणि एका अधिकार्याची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी एका अधिकार्याच्या नेतृत्वाखाली दहा पोलीस कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांचा आंदोलनाला पाठिंबा

मुंबई : दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. रणरणत्या उन्हात भविष्याची चिंता घेऊन रस्त्यावर उतरणार्या तरुण पिढीला कॉक्रोच म्हणून हिणवणे व न्याय नाकारणे योग्य नाही. ही तरुण पिढी कॉक्रोच बनून आक्रोश करीत असून त्यांना कमी लेखू नका, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. नीट पेपरफुटीविरोधात अभिजित दिपके या तरुणाने समाजमाध्यमांद्वारे ‘कॉक्रोच जनता पार्टी’ हे आंदोलन छेडले.

वृत्तवाहिन्यांची पाठ

दिल्लीत ‘जंतरमंतर’वरील या आंदोलनाला देशातील बहुसंख्य वृत्तवाहिन्यांनी फारशी प्रसिद्धी दिली नाही. मात्र अनेक यूट्यूब वाहिन्यांवरून त्याचे थेट प्रसारण सुरू होते. परदेशातील काही यूट्यूब वाहिन्यांनी तर राजकीय विश्लेषक, सीजेपीचे प्रवक्ते यांच्या प्रतिक्रियांसह या आंदोलनाचे वार्तांकन केले.

आंदोलनाने भारावलो – वांगचुक

तरुणांच्या शांततापूर्ण आंदोलनाने भारावून गेलो, असे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सांगितले. सरकारने आंदोलनाला परवानगी दिल्याबद्दल आभार मानले. भविष्यातही अशा आंदोलनांना परवानगी देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

काही शक्ती देशातील युवकांना नकारात्मक राजकारणाकडे ढकलत आहेत. आजच्या तरुणाला राष्ट्र उभारणीत तसेच त्यांचे भविष्य घडविण्यात योगदान द्यायचे आहे. मात्र काही जण युवकांना व्यवस्थेविरोधात भडकावत आहेत. – नितीन नवीन, भाजप अध्यक्ष.