Mary Millben accuses Abhijeet Dipke and CJP of receiving US funding to oppose PM Modi: प्रसिद्ध अमेरिकन गायिका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रशंसक मेरी मिलबन यांनी कॉक्रोच जनता पार्टीबाबत एक मोठा दावा केला आहे. अभिजीत दिपके आणि त्यांच्या कॉक्रोच जनता पार्टीला अमेरिकेतील देणगीदारांकडून देणगी मिळत असल्याचा दावा मिलबन यांनी केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी हा निधी पुरवला जात आहे”, असाही आरोप मेरी मिलबन यांनी केला. कॉक्रोच जनता पार्टीच्या फंडिंगवरून भाजपाकडून वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आता अमेरिकन गायिकाच याबाबत भाष्य करत असल्यामुळे या विषयावर नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मेरी मिलबन यांनी एक्सवर याबाबत सविस्तर पोस्ट टाकली आहे. त्यांनी भारतातील तरुण देशभक्तांना उद्देशून म्हटले, “माझ्या तरुण देशभक्तांनो, तुमचे पंतप्रधान (मोदी) २५ वर्षांपासून भारताची सेवा करत आहेत. त्यात ते १२ वर्ष पंतप्रधान म्हणून सलग तीन वेळा निवडून आले. माझ्या देशातील विघटनकारी शक्तींपुढे ते झुकणार नाहीत.”
‘देणगीदारांची चाल’
मेरी मिलबन पुढे म्हणाल्या, “या निवडक देणगीदारांची जागतिक पातळीवर एक विशिष्ट पद्धत आहे. ते जगभरातील पुराणमतवादी नेत्यांना लक्ष्य करतात. यासाठी ते अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हेरतात. त्यांना कट्टरपंथी बनवतात आणि पुन्हा त्यांच्या देशात पाठवतात. त्यांच्या देशात अनागोंदी निर्माण करण्यासाठी या विद्यार्थ्यांना निधी पुरवला जातो. यापैकी आजवर कुणीही यशस्वी झालेले नाही. मात्र त्यांनी देशाच्या विकासाच्या प्रयत्नांवर परिणाम केला आहे.”
भारतीय तरुणांनी सीजेपीचा निषेध करावा
“आता भारताला एका नव्या आवाजाची गरज आहे. हा आवाज भारतात जन्मलेला, वाढलेला आणि तिथेच शिक्षण घेतलेला असेल. जो पुढे येऊन कॉक्रोच जनता पार्टीच्या विघटनकारी आंदोलनाचा शांततेने विरोध करेल. लोकशाही आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी नेहमीच एका प्रति-चळवळीची आवश्यकता असते. त्यामुळे भारतीय तरुणांनो पुढे या, आवाज उचला..”, असे आवाहनही गायिका मेरी मिलबन यांनी केले आहे.
कोण आहेत मेरी मिलबन?
मेरी मिलबन यांनी यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना भारतातील विरोधकांना टोला लगावला होता. २०२२ साली भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यादरम्यान त्या भारतात प्रकाशझोतात आल्या होत्या. २०२३ मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात भारताचे राष्ट्रगीत आणि ‘ओम जय जगदीश हरे’ हे गीत गायले होते.
मेरी मिलबन या आफ्रिकन-अमेरिकन गायिका असून त्यांनी हॉलिवूडमधील चित्रपटांतही काम केलेले आहे.
सीजेपीच्या फंडिंगवर अभिजीत दिपके काय म्हणाले होते?
कॉक्रोच जनता पार्टीला कुणाकडून निधी मिळतो, याबाबतचा प्रश्न यापूर्वीही अनेकदा उपस्थित करण्यात आला आहे. सूरतचे आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी यासंबंधीचे प्रश्न विचारले होते. तसेच दिपके यांना बोस्टन विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी कुणी पैसा पुरवला, यावरही त्यांनी संशय व्यक्त केला होता.
