राजधानी दिल्लीत लवकरच एका मोठ्या राजकीय आणि सामाजिक आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी त्यांच्या आगामी आंदोलन मोहिमेबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले असून, ‘जंतर-मंतर सीझन २’ लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांच्या या घोषणेमुळे दिल्लीच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर नागरिकांकडून येणाऱ्या प्रतिक्रियांचा संदर्भ देत दिपके यांनी सांगितले की, “जंतर-मंतरनंतर पुढील आंदोलन कधी होणार, असा प्रश्न अनेक नागरिक आणि तरुण सातत्याने विचारत होते. मला त्यांना सांगायचे आहे की, जंतर-मंतरचा ‘भाग-२’ लवकरच येणार आहे.”
तरुणांचे प्रश्न आणि शिक्षणव्यवस्थेवर भर
अभिजीत दिपके यांनी या आंदोलनाची निश्चित तारीख, वेळ किंवा प्रमुख मागण्यांबाबतची सविस्तर माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. तरीही जंतर-मंतरवरील पहिल्या टप्प्यातील आंदोलनानंतर सीजेपी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट दिसते.
प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधी देशातील सामाजिक व राजकीय व्यवस्था सुधारण्यासाठी आणि सामान्य जनतेच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी एक भक्कम ‘दबाव गट’ (Pressure Group) म्हणून काम करण्याचा निर्णय सीजेपीने घेतला आहे. विशेषतः तरुण आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून ही संघटना आपली पकड मजबूत करत आहे.
‘स्कूल ठीक करो’ अभियानाची हाक
ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेच्या दयनीय अवस्थेवर बोट ठेवत सीजेपीने ‘स्कूल ठीक करो’ हे विशेष अभियानही हाती घेतले आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर प्रशासनाला धारेवर धरले होते.
अभिजीत दिपके यांची सोशल मीडिया पोस्ट:
“स्वातंत्र्याची ८० वर्षे पूर्ण झाल्यानंतरही ग्रामीण भागातील निष्पाप लहान मुलांना शाळांमध्ये मूलभूत सुविधांसाठी याचना करावी लागत आहे. एक देश म्हणून आपण ग्रामीण भागातील मुलांच्या भवितव्याबाबत अपयशी ठरलो आहोत. म्हणूनच सीजेपीतर्फे सरकारी शाळांची स्थिती बदलण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे.”
ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेत ठोस बदल घडवून आणण्यासाठी या मोहिमेत पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
“वरून दबाव आहे…”; दिल्लीतील बैठकीवरून प्रशासनावर गंभीर आरोप
नव्या आंदोलनाच्या घोषणेसोबतच, अभिजीत दिपके यांनी दिल्लीत संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करताना आलेल्या अडचणींचा पाढा वाचला. दिल्लीत मेळाव्यासाठी सभागृह (हॉल) मिळवताना पक्षाला मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागल्याचा दावा त्यांनी केला आहे.
“आज दिल्लीत आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी आम्ही अनेक ठिकाणी हॉल शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र ‘वरून दबाव आहे’ असे सांगत जागा देण्यास नकार दिला गेला. अत्यंत मेहनतीने आणि पावती फाडून एका हॉलचे बुकिंग निश्चित केले होते, पण आज सकाळीच संबंधित मालकाला थेट धमक्या देण्यात आल्या. ‘इथे बैठक होऊ दिली तर उलटे टांगू’ असा इशारा हॉल मालकाला मिळाला,” असा गंभीर आरोप दिपके यांनी केला.
या कथित दबावामागे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा (भाजप) हात असल्याचा थेट आरोप करत दिपके म्हणाले, “त्यांच्या कृती आणि वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की ते देशातील तरुणाईला प्रचंड घाबरले आहेत. अशा क्षुद्र आणि हलक्या कारवायांनी सीजेपीचा आवाज दबेल असा गैरसमज त्यांनी करून घेतला असेल, तर तो त्यांनी लवकरात लवकर दूर करावा.”
