Cockroach Janata Party Abhijeet Dipke Return to India: कॉकरोच जनता पक्षाचे ३० वर्षीय संस्थापक अभिजीत दिपके ६ जून रोजी अमेरिकेतून भारतात परतणार आहेत. “भारतात परतल्यानंतर मला अटक होऊ शकते, पण तरीही मी भारतात येणार आहे”, असं त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगतिलं. “मला आता थेट विमानतळावरच भेटा”, असं त्यांनी समर्थकांना आवाहन केलं आहे.
अभिजीत दिपके म्हणाले, “विमानतळावर उतरताच मला अटक होऊ शकते, याची मला पूर्ण कल्पना आहे. तरीही मी भारतात येणार आहे.” परीक्षेतील वारंवार होणाऱ्या अपयशांमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या त्वरित राजीनाम्याची मागणी करण्यासाठी शांततापूर्ण आणि संविधानिक आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी ते भारतात येणार आहेत.
कसा असेल आंदोलनाचा कार्यक्रम
विमानतळावरून दिपके थेट पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनवर चालत जाणार आहेत. तिथून जंतर-मंतरपर्यंत आंदोलन करण्यासाठी ते रीतसर परवानगी मागणार आहेत. हे आंदोलन पूर्णपणे अहिंसक आणि संविधानिक असेल, असंही त्यांनी स्पष्ट केले. “माझ्या परतीचे परिणाम काय होतील याची मला पूर्ण खात्री आहे, (परंतु) परत येण्याबाबतही माझे मन पक्के आहे”, असं दिपके यांनी अमेरिकेतून बोलताना सांगितले. ते अजूनही आशावादी आहेत. “अनेक लोकांनी मला पाठिंबा दर्शवला असून ते या शांततापूर्ण आंदोलनात सामील होतील असे म्हटले आहे. भारतीय संविधानाने मला दिलेल्या मूलभूत हक्काचा वापर करण्यासाठी मी परत येत आहे”, असं त्यांनी स्पष्ट केलं.
१ कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात
NEET पेपर लीक प्रकरण आणि CUET, CBSE व SSC GD सारख्या भरती व प्रवेश परीक्षांमधील गोंधळ या पार्श्वभूमीवर हे आंदोलन होत आहे. दिपके यांच्या मते, या प्रकरणांमुळे १ कोटीहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. दिपके म्हणाले की, हा प्रश्न कोणत्याही एका परीक्षेपुरता मर्यादित नाही. सरकारला जबाबदारीची जाणीव करून देणे ही आमची दीर्घकालीन योजना आहे, असं ते म्हणाले.
कुटुंबाची चिंता किंवा मिळणाऱ्या धमक्यांमुळे भीती वाटते का, असं विचारलं असता त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. “गेल्या काही दिवसांत मी अनेक प्रकारच्या जीवे मारण्याच्या धमक्यांचा सामना केला आहे”, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्यावर होणारे फंडिंगचे आरोप आणि बांगलादेश व नेपाळसारखी ‘जेन झी’ (Gen Z) क्रांती घडवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या दाव्यांमुळे ते अजिबात विचलित झालेले नाहीत. “मी फक्त सरकारला प्रश्न विचारले आहेत”, असं ते म्हणाले.
