Abhijeet Dipke criticizes Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेन्ट’ या कॉमेडी शोमुळे वादात सापडलेला कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा नव्याने हा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये प्रसिद्ध चेहऱ्यांना येण्याचे आमंत्रण दिले जाते. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेन्ट शोमध्ये उपस्थिती लावण्याचे आमंत्रण मिळाल्यास जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता दिपके यांनी स्पष्टपणे नकार दिला. एवढेच नव्हे तर समय रैनाची पार्श्वभूमी ‘सधन’ असल्याचे मत दिपके यांनी नोंदवले.

इंडियाज गॉट लेटेन्टमध्ये जाणार का?

अनफिल्टर्ड बाय समधीश या युट्युब चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत अभिजीत दिपके यांनी सध्या नीट पेपरफुटीबाबत सुरु असलेल्या आंदोलनावर आणि इतर विषयांवर मत मांडले. ‘इंडियाज गॉट लेटेन्ट’ या शोमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण मिळाल्यास जाणार का? असा प्रश्न समधीश भाटिया यांनी अभिजीत दिपके यांना चर्चेवेळी विचारला. यावर दिपकेंनी, “मी नाही जाणार, मला आवडत नाही”, असे स्पष्ट उत्तर दिले. दिपकेंनी या शोच्या मानसिकतेवर देखील प्रश्न उपस्थित केले.

सधन मानसिकतेवर भाष्य

लेटेन्ट शोबाबत असे मत का आहे? याबाबत बोलताना दिपकेंचा शो सधन मानसिकता दर्शवतो. “काही लोकांना त्यांच्या कृतीमुळे होणाऱ्या परिणामांकडे दुर्लेक्ष करता येते, कारण त्यांना त्या कृत्यांमधून आनंद मिळत असतो”, असे मत दिपकेंनी मांडले. “आपण संघर्ष का करावा असा विचार करतात आणि आपण यातून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग निवडतो, आणि तुम्हाला बाहेर पडणे सोपे जाते कारण तुम्ही सधन पार्श्वभूमीतून येता”, असे मत दिपकेंनी मांडले.

नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया

दिपकेंच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर नेटकरी व्यक्त होऊ लागले आहेत. काही जणांनी दिपकेंच्या या वक्तव्याचे समर्थन केले आहे तर कहींनी यावर आक्षेप नोंदवला आहे. सधन पार्श्वभूमीतून येणाऱ्या लोकांबद्दल बोलण्यास दिपके योग्य व्यक्ती आहेत का? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला. दिपकेंनी स्वत: अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात पदव्युत्तर पदवी घेतली. दिपकेंना काही नेटकऱ्यांनी ढोंगी म्हणत टीका केली. काही नेटकऱ्यांनी अभिजीत दिपकेंच्या वक्तव्याचे समर्थनही केले आहे.