CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांना १० ऑक्टोबर रोजी थेट विमानातून ताब्यात घेतल्यानंतर पोलीस स्थानकात ठेवण्यात आलं. त्यांच्या आजीचं निधन झाल्याचं वृत्त दिल्ली पोलिसांनी त्यांना सांगितल्याचा एक व्हिडीओही नंतर जारी करण्यात आला. शिवाय, दिल्ली पोलिसांनीच अभिजीत दिपकेंना घरी जाण्यास सांगितल्याचाही दावा दिल्ली करण्यात आला होता. यासंदर्भात दिल्ली पोलिसांच्या पत्रकार परिषदेत या घडामोडींचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला होता. यावर आता अभिजीत दिपकेंनी प्रत्युत्तर दिलं असून थेट दिल्ली पोलिसांना आव्हान दिलं आहे.
दिल्ली पोलिसांनी एडिट केलेला व्हिडीओ दाखवला – दिपके
दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत एडिट केलेला व्हिडीओ दाखवला असून त्यांनी संपूर्ण व्हिडीओ दाखवावा, अस आव्हान अभिजीत दिपकेंनी माध्यमांशी बोलताना दिलं आहे. “दिल्ली पोलिसांमध्ये जर हिंमत असेल, तर त्यांनी मी पोलीस स्टेशनमध्ये असतानाचा पूर्ण व्हिडीओ जाहीर करावा. त्या व्हिडिओमध्ये मी पोलिसांना वारंवार मला माझ्या भावाशी बोलू देण्याची विनंती करत आहे. माझ्या वकिलांशी बोलण्यासाठी दोन मिनिटं मी माझा मोबाईल मागत होतो. तुम्ही तो व्हिडीओ जाहीर का करत नाही आहात? तुम्ही फक्त एडिट केलेला व्हिडीओ दाखवत आहात”, असं अभिजीत दिपके यावेळी म्हणाले.
“तुमच्यात जर हिंमत असेल तर पूर्ण व्हिडीओ दाखवा. त्या व्हिडीओत जनतेला कळेल की कशाप्रकारे तुम्ही माझे मूलभूत अधिकारही नाकारले. कुणालाही अटक केल्यावर किंवा ताब्यात घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या वकिलाशी बोलू देणं हा त्या व्यक्तीचा अधिकार असतो. दिल्ली पोलिसांनी तेही करू दिलं नाही. आणि आता ते म्हणतायत की आजीचं निधन झालंय त्यामुळे आम्ही अभिजीतला सांगितलं की तुम्ही इथे थांबावं असं आम्हाला वाटत नाही वगैरे”, अशा शब्दांत दिपकेंनी आपला आक्षेप नोंदवला.
“रात्री ३.३० वाजता माझी सही घ्यायला का आला होतात?”
दरम्यान, यावेळी अभिजीत दिपकेंनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. ताब्यात असताना पहाटे ३.३० वाजता दिल्ली पोलिसांनी त्यांना अटकेच्या कागदपत्रांवर सही करण्याची गळ घातल्याचं दिपके म्हणाले आहेत.
“जर दिल्ली पोलिसांनी मला घरी पाठवायची तयारी दाखवली होती, तर मग रात्री साडेतीन वाजता माझ्याकडे अटकेसंदर्भातली कागदपत्र का घेऊन आले? मला झोपेतून उठवून ते म्हणाले की हे तुझे अरेस्ट पेपर्स आहेत. तू दीर्घ काळासाठी जेलमध्ये जाणार आहेस. यावर लवकर सही कर. मी म्हटलं माझ्या वकिलांशी बोलल्याशिवाय मी कशावरही सही करणार नाही. तर म्हणाले असं चालणार नाही. तुला सही करावीच लागेल”, असं अभिजीत दिपके म्हणाले.
“पोलीस मला म्हणाले, तुझ्या आई-वडिलांना फोन करून सांग तुला दीर्घ काळासाठी अटक होणार आहे. मी म्हटलं मी साडेतीन वाजता माझ्या आई-वडिलांना का फोन करू? दिवसभर मला कुठे ठेवलं हे ना मला सांगितलं, ना आई-वडिलांना सांगितलं ना माझ्या वकिलांना सांगितलं. दिल्ली पोलीस मानसिक अत्याचार करत होते. माझ्यावरच नाही, माझ्या आई-वडिलांवरदेखील. मला कुठे ठेवलंय हे त्यांनी माझ्या आई-वडिलांना का नाही सांगितलं? त्यांच्यात माणुसकी नव्हती का?” असा संतप्त सवाल अभिजीत दिपकेंनी केला आहे.
