Abhijeet Dipke Grandmother Death Police Detention Video Response : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी रविवारी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटलं आहे की, कोठडीत असताना पोलिसांनी त्यांना त्यांचा फोन वापरू दिला नाही आणि त्यांच्या वकिलाशीही संपर्क साधू दिला नाही. रात्री साडेतीन वाजता पोलिसांनी त्यांना त्यांच्या वडिलांना फोन करायला का लावला आणि आपल्याला दीर्घकाळासाठी तुरुंगात पाठवले जाऊ शकते असे वडिलांना सांगण्यास का सांगितले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अभिजीत दिपकेंसहित त्यांच्या साथीदारांना शनिवारी विमानातूनच अटक करण्यात आली. २४ तास त्यांच्याविषयी कोणतीही माहिती समोर येऊ दिली नाही. ते कोणत्या तुरुंगात आहेत, याचीही माहिती त्यांच्या पालकांना होऊ शकली नाही. दरम्यान, शनिवारीच अभिजीत दिपकेंच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन झालं. त्यामुळे अंत्यदर्शनाला जाण्याकरता तरी पोलिसांनी सोडायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया दिपकेंच्या कुटुंबियांकडून आली. तसंच, आजीच्या निधनाचं वृत्त कळल्यानंतरही पोलिसांनी सहकार्य केलं नसल्याचा दावा दिपकेंसहित सीजेपीच्या नेत्यांनी केला.
सीजेपीच्या नेत्यांनी काय आरोप केला?
आशुतोष रांका म्हणाले की, अभिजीत दिपकेच्या आजीचं निधन झालं. याबाबतची माहिती देताना दिपके यांच्याशी जी काही चर्चा चालली होती त्याचं दिल्ली पोलिसांनी व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं. अभिजीतला जेव्हा पोलीस ही बातमी सांगायला आले तेव्हा दिल्ली पोलिसांचा अमानवी चेहरा दिसला. दिपके यांना त्याच्या आजीच्या निधनाची बातमी सांगितली तेव्हा दिल्ली पोलिसांच्या हाती कॅमेरा आणि माईक होता. दिपके यांनी सांगितलं की मला माझे आई वडील संवेदनशील आहेत, ते हार्ट पेशंट आहेत, मला माझ्या आई वडिलांची काळजी वाटते. मला तुम्ही माझ्या भावाशी बोलणं करून द्या. पण दिल्ली पोलिसांनी फोन करू दिला नाही. अशा पद्धतीचं वातावरण तिथे होतं. आज सुटकेनंतर दिपके हे त्यांच्या आजीच्या अंत्यसंस्कारांसाठी गेले आहेत. असा आरोप रांका यांनी केला. पण दिल्ली पोलिसांनी हे आरोप खोडले आहेत.
दिल्ली पोलिसांनी दावा खोडून काढला
सीजेपीच्या नेत्यांनी केलेला दावा दिल्ली पोलिसांनी खोडून काढला. दिल्ली पोलीस म्हणाले, “जेव्हा अभिजीत दिपकेंच्या आजीच्या निधनाची बातमी समजली तेव्हा ती देण्यासाठी दिल्ली पोलीस दिपकेंच्या जवळ गेले आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन दिलं. फ्लाईट, कॉल्स किंवा जी आवश्यकता आहे ती मदत आम्ही करू असं त्यांना सांगितलं. आम्ही दिपकेंना असंही सांगितलं की तुमची इच्छा असेल तर आई वडिलांशीही बोलणं करून देतो. मात्र अभिजीत दिपके यांनी संमती दिली नाही. त्यांनी निधनाची बातमी ऐकल्याने आम्ही त्यांना विचार करण्यासाठीचा वेळही दिला. त्यानंतर पुन्हा काही वेळाने मदतीसंदर्भात विचारणा केली. मात्र सीजेपीच्या पत्रकार परिषदेत हे वास्तव चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं, असं म्हणत त्यांनी पोलिसांनी एक व्हिडीओही दाखवला. या व्हिडीओत पोलीस अभिजीत दिपके यांना मदत हवी आहे का हे विचारताना दिसत आहेत. सर्व प्रकारचं सहकार्य करायला तयार आहेत असं सांगत आहेत. त्यांना पाणीही देण्यात आलं. हे देखील या व्हिडीओत दिसतं आहे.
अभिजीत दिपके काय म्हणाले?
दरम्यान, पोलिसांच्या दाव्यावर अभिजीत दिपके यांनीही आता प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या आजीबरोबर जो भाऊ राहत होता, त्याच्याशी संपर्क साधण्याची मी विनंती केली होती. त्याकरता मी काही काळाकरता तरी मला फोन द्या, अशी मागणी केली. मग दिल्ली पोलिसांनी मला फोन का दिला नाही? मी माझ्या वकिलांशीही चर्चा करण्याची विनंती केली होती, तीही विनंती फेटाळण्यात आली.
पहाटे साडेतीन वाजता दिल्ली पोलीस आले आणि मला म्हणाले की वडिलांना फोन करून सांग की मी दीर्घकाळ तुरुंगात राहणार आहे. आम्ही आधीच आमच्या आजीला गमावलेलं असताना अजून किती त्रास देणं अपेक्षित आहे पोलिसांना? असा सवालही अभिजीत दिपकेंनी विचारला.
पहाटे साडेतीन वाजता माझ्या कुटुंबाला फोन करायला लावण्यामागे पोलिसांचा काय हेतू होता? माझ्या कुटुंबियांना त्यांना यातना काय द्यायच्या होत्या का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
