मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे होणाऱ्या आंदोलनापूर्वीच राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके आणि त्यांच्या साथीदारांना दिल्ली विमानतळावर उतरताच पोलिसांनी ताब्यात घेतले. दिपके यांच्या अटकेनंतर आता या आंदोलनाची संपूर्ण धुरा अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

विमानतळावर कारवाई होण्याच्या शक्यतेने अभिजीत दिपके यांनी शुक्रवारी रात्रीच एक व्हिडिओ संदेश रेकॉर्ड करून ठेवला होता. हा व्हिडिओ सीजेपीकडून जारी करण्यात आला असून, त्यात दिपके यांनी म्हटले आहे, “हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतोय याचा अर्थ मला, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आमच्या अनुपस्थितीत आता अजिंक्य शिंदे या आंदोलनाचे नेतृत्व करतील. सर्वांनी अजिंक्य यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुढे न्यावे.”

कोण आहेत अजिंक्य शिंदे?

महाराष्ट्राचे असलेले अजिंक्य शिंदे हे ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे राष्ट्रीय संघटना प्रभारी आहेत. मुंबईत नुकत्याच झालेल्या सीजेपीच्या आंदोलनाचे आयोजन करण्यात अजिंक्य यांचा मुख्य सहभाग होता. मुंबईतील आंदोलनानंतर सीजेपीचा मुख्य चेहरा म्हणून अजिंक्य शिंदे समोर आले आहेत. देशातील सरकारी शाळांची अवस्था सुधारण्यासाठी सीजेपीने चालवलेल्या राष्ट्रीय मोहिमेचे नेतृत्व अजिंक्य यांनी केले होते. आपल्या आक्रमक आणि मुद्देसूद मांडणीमुळे अजिंक्य यांचा तरुण वर्गात मोठा प्रभाव असून, इन्स्टाग्रामवर त्यांचे हजारो फॉलोअर्स आहेत. गांधी जयंतीदिनी दादर येथे विनापरवाना एकत्र येऊन घोषणाबाजी केल्याप्रकरणी अभिजित दीपके आणि अजिंक्य शिंदे यांच्यासह इतर ४०० कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

दिल्ली विमानतळावर पोलिसांची मोठी कारवाई

शनिवारी सकाळी अभिजित दिपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. इतर प्रवासी विमानातून उतरण्यापूर्वीच पोलिसांचे पथक विमानात दाखल झाले आणि त्यांनी या तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

त्याआधी सकाळी सीजेपीच्या कायदेशीर कक्षाच्या प्रमुख रत्ना सिंह यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी या सर्व नेत्यांना एका अज्ञात स्थळी हलवल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे. सीजेपीने या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, “ही कारवाई हुकूमशाही स्वरूपाची आणि नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे,” अशी टीका केली आहे.

संयोजक आणि मुख्य नेत्यांना ताब्यात घेतले तरीही जंतर-मंतरवरील पूर्वनियोजित आंदोलन अजिंक्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडेल, असा ठाम निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे.