दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात ‘लहरा दो तिरंगा’ मोर्चापूर्वी ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके आणि विद्यार्थी नेत्या नेहा बोरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कॅनॉट प्लेस येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘लहरा दो तिरंगा’ मोर्चाला परवानगी नाकारल्याची नोटीस बजावल्यानंतर तासाभरातच दिल्ली पोलिसांनी दिपकेंना ताब्यात घेतलं. CJP चे तिन्ही मुख्य चेहरे सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याने संघटनेसमोर नेतृत्व संकट उभे ठाकले आहे. मात्र, या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आमचा ‘प्लॅन बी’ तयार असल्याचा दावा कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आला आहे. ‘इंडिया टूडे’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

अभिजीत दिपके यांना ताब्यात घेण्याच्या काही मिनिटे आधी CJP च्या मीडिया टीमचे प्रतिनिधी विजय एम यांनी माहिती दिली की, १० ऑक्टोबर रोजी झालेल्या आंदोलनाप्रमाणेच या वेळीही पक्षाने ऐनवेळची रणनीती म्हणून ‘प्लॅन बी’ तयार ठेवला आहे. दिल्ली पोलिसांनी दिपकेंना रोखल्यास किंवा ताब्यात घेतल्यास आम्ही आमची नवी रणनीती जाहीर करू, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या अटकेनंतर आता आंदोलनाची धुरा कोण सांभाळणार आणि CJP चा हा ‘प्लॅन बी’ नेमका काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सौरव दास आणि आशुतोष रांका तुरुंगात

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतील (SIR) कथित गैरप्रकारांवरून ‘सीजेपी’ने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यातच पक्षाचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना या आठवड्यात झालेल्या अटकेच्या निषेधार्थ या मोर्चाची हाक देण्यात आली होती.

सीजेपीची मोदी-शाहांवर टीका

अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या एक्स हँडलवरून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करण्यात आली आहे. मोदी आणि शाह आणखी किती लोकांना अटक करणार आहे? असा प्रश्न विचारताना सीजेपीने म्हटले की, अभिजीत दिपकेंना अवैधपणे ताब्यात घेण्यात आलेले आहे. तसेच प्रत्येक अटकेनंतर आणखी युवक रस्त्यावर उतरतील, असा इशारा देण्यात आला.